भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम १८ :
बँकर्सच्या वह्यांचे निरीक्षण करण्याचे अधिकार :
मिळालेल्या माहितीवरून किंवा अन्यथा, कलम १७ अन्वये अन्वेषण करण्याचा अधिकार ज्या पोलीस अधिकाऱ्यास देण्यात आला असेल अशा पोलीस अधिकाऱ्यास संशय घेण्यास कारण असेल आणि अपराधाचे अन्वेषण किंवा चौकशी करण्याच्या प्रयोजनासाठी कोणत्याही बँकर्सच्या वह्या तपासणे त्यास आवश्यक वाटल्यास, त्यास त्या काळी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही तो अपराध ज्याने केल्याचा संशय असेल त्या व्यक्तीच्या खात्याशी किंवा अशा व्यक्तीच्या वतीने जिने पैसा आपल्या ताब्यात ठेवला असल्याचा संशय असेल अशा अन्य व्यक्तीच्या खात्याशी संबंधित असेल तेथवर कोणत्याही बँकर्सच्या वह्यांचे अन्वेषण करता येईल आणि त्यातील संबध्द नोंदीच्या प्रमाणित प्रती घेता येतील किंवा घेण्याची व्यवस्था करता येईल आणि या कलमाखालील आपल्या अधिकारांचा वापर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास सहाय्य करणे संबंधित बँकेस बंधनकारक असेल:
परंतु, पोलीस अधीक्षकापेक्षा कमी दर्जाच्या असलेल्या कोणताही पोलीस अधिकाऱ्यास, पोलीस अधीक्षकाच्या किंवा त्याहून वरच्या दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने याबाबतीत विशेषरीत्या प्राधिकृत केले असल्याखेरीज, कोणत्याही व्यक्तीच्या खात्याच्या संबंधात या कलमांखालील कोणत्याही अधिकाराचा वापर करता येणार नाही.
स्पष्टीकरण :
या कलमामध्ये बँक आणि बँकर्सच्या वह्या या शब्दप्रयोगांना, बँकर्सची पुस्तके अधिनियम, १८९१ (१८९१ चा ८) यामध्ये अनुक्रमे जो अर्थ नेमून दिला असेल तोच अर्थ असेल.