Pca act 1960 कलम २३ : नोंदणी करण्याची पद्धती :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम २३ :
नोंदणी करण्याची पद्धती :
(१) खेळ करणाऱ्या कोणत्याही प्राण्याचे प्रदर्शन करण्यास किंवा त्याला प्रशिक्षण देण्यास इच्छूक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तिने विहित फी भरल्यावर, या प्रकरणाखाली न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे, ती अशी नोंदणी करण्यास हक्कदार नसणारी व्यक्ती नसेल तर, या अधिनियमाखाली नोंदणी करण्यात येईल.
(२) या प्रकरणान्वये नोंदणी करण्यासाठी केलेल्या अर्जामध्ये, विहित करण्यात येईल त्याप्रमाणे प्राणी आणि प्राण्यांचा खेळ करून ज्या प्रकारे त्यांना प्रदर्शित करावयाचे आहे किंवा त्यांना प्रशिक्षण द्यावयाचे आहे त्याचे सर्वसाधारण स्वरूप, या तपशिलाचा समावेश असेल, आणि अशा प्रकारे देण्यात आलेल्या तपशिलाची नोंद विहित प्राधिकरणाकडून ठेवण्यात आलेल्या नोंदवहीत घेण्यात येईल.
(३) विहित प्राधिकरण, त्याने ठेवलेल्या नोंदवहीत ज्या व्यक्तीने नाव आढळेल अशा प्रत्येक व्यक्तीस, नोंदवहीत नोंदलेला तपशील अंतर्भूत असणारे, विहित नमुन्यातील नोंदणी प्रमाणपत्र देईल.
(४) या प्रकरणाखाली ठेवण्यात आलेली प्रत्येक नोंदवही विहित फी भरल्यावर सर्व वाजवी वेळी निरीक्षणासाठी खुली राहील आणि कोणतीही व्यक्ती, विहित फी भरल्यावर तिची नक्कल घेण्यास किंवा त्यातून उतारे काढण्यास हक्कदार असेल.
(५) नोंदवहीमध्ये जिचे नाव असेल अशी कोणतीही व्यक्ती, या अधिनियमाखाली, कोणत्याही न्यायालयाने दिलेल्या कोणत्याही आदेशाच्या उपबंधाच्या अधीनतेने, नोदवहीत नोंद करण्यात आलेल्या कोणत्याही तपशिलात फेरफार करण्यासाठी अर्ज करण्यास हक्कदार असेल आणि जेव्हा अशा कोणत्याही तपशिलात फेरफार करण्यात येईल तेव्हा विद्यमान प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल आणि त्याला नवीन प्रमाणपत्र देण्यात येईल.

Leave a Reply