प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम १७ :
समितीचे कर्तव्य आणि प्राण्यांवर प्रयोग करण्यासंबंधी नियम करण्याची समितीची शक्ती :
(१) प्राण्यांवर प्रयोग करण्यापूर्वी, ते करीत असताना किंवा केल्यानंतर त्यांना उगीचच वेदना किंवा यातना देऊन ते करण्यात आलेले नाहीत याची खातरजमा करून घेण्यासाठी आवश्यक असतील अशा सर्व उपाययोजना करणे हे, समितीचे कर्तव्य असेल, आणि त्या प्रयोजनार्थ, ती भारताच्या राजपत्रातील अधिसूचनेद्वारे आणि पूर्व प्रकाशनाच्या अधीनतेने असे प्रयोग करण्यासंबंधात तिला योग्य वाटतील असे नियम करू शकेल.
१.(१क(अ)) विशेषत: आणि पूर्वगामी शक्तींच्या व्यापकतेस बाध न येता, खालील बाबींकरिता असे नियम करण्यात येतील त्या अशा –
(a)(क)(अ) प्राण्यांवर प्रयोग करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांची नोंदणी करणे;
(b)(ख)(ब) प्राण्यांवर प्रयोग करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांनी अहवाल व इतर माहिती समितीकडे अग्रेषित करणे.)
(२) विशेषत: आणि पूर्वगामी शक्तींच्या व्यापकतेला बाध न येता, समितीकडून केल्या जाणाऱ्या नियमांची रचना, खालील उद्दिष्टे साध्य होतील हे निश्चित करण्याच्या दृष्टीने करण्यात येईल –
(a)(क)(अ) कोणत्याही संस्थेमध्ये जेव्हा प्रयोग केले जात असतील तेव्हा त्यांची खबरदारी त्या संस्थेच्या प्रभारी व्यक्तीवर टाकण्यात येईल आणि कोणत्याही संस्थेच्या बाहेर जेव्हा व्यक्तीकडून प्रयोग केले जात असतील तेव्हा त्या व्यक्ती, त्या संबंधात अर्हताप्राप्त असतील आणि त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रयोगाची संपूर्ण जबाबदारी त्या व्यक्तीवर राहील;
(b)(ख)(ब) यथोचित काळजी घेऊन आणि भूतदयेने प्रयोग करण्यात येतील आणि शक्य असेल तेथवर शस्त्रक्रियांचा अंतर्भाव असणारे प्रयोग, प्राण्यांना होणाऱ्या वेदनांना प्रतिबंध करण्याचे पुरेसे सामथ्र्य असलेल्या काही बधिरकांच्या प्रभावाखाली करण्यात येतील;
(c)(ग) (क) बधिरकांच्या प्रभावाखाली प्रयोग करताना, ज्या प्राण्यांना अशा प्रकारजी इजा झालेली असेल की त्यातून बरे होताना त्यांना गंभीर यातना होणार असतील, अशा प्राण्यांचा ते संवेदनाशून्य अवस्थेत असेतोपर्यंत सामान्यपणे नाश केला जाईल;
(d)(घ)(ड) प्राण्यांवर प्रयोग करणे जेव्हा जेव्हा टाळणे शक्य असेल तेव्हा तेव्हा तसे केले जाईल, उदाहरणार्थ वैद्यकीय विद्यालये, रूग्णालये, महाविद्यालये यांमध्ये आणि तत्सम ठिकाणी पुस्तके, प्रतिमाने (मॉडेल्स), फिल्म्स आणि तत्सम शैक्षणिक साधने तितकीच पुरेशी असतील तेव्हा तसे केले जाईल;
(e)(ङ)(इ) मोठ्या प्राण्यांवर प्रयोग करून मिळणारे निष्कर्ष हे जेव्हा गिनिपिग, ससे, बेडूक व उंदीर यांसारख्या लहान प्रयोगशालेय प्राण्यांवर प्रयोग केले असता मिळणाऱ्या निष्कर्षासारखेच मिळण्याची शक्यता असेल तर मोठ्या प्राण्यांवर प्रयोग करण्याचे टाळले जाईल;
(f)(च)(फ) शक्य असेल तेथवर, हस्तकौशल्य संपादन करण्यासाठी प्रयोग करता येणार नाहीत;
(g)(छ)(ग) प्रयोग करण्याच्या उद्देशाने आणलेल्या प्राण्यांची, प्रयोग करण्यापूर्वी किंवा प्रयोग केल्यानंतर अशा दोन्ही वेळी योग्य ती काळजी घेतली जाईल;
(h)(ज)(ह) प्राण्यांवर प्रयोग करण्याच्या बाबतीतील योग्य ते अभिलेख ठेवले जातील.
(३) या कलमान्वये कोणताही नियम करताना समितीला (ज्या उद्दिष्टांसाठी समिती स्थापन करण्यात आली असेल, त्या उद्दिष्टांशी सुसंगत) असे जे निदेश केंद्र सरकार देऊ शकेल ते निदेश देऊन मार्गदर्शन करण्यात येईल आणि केंद्र सरकारला याद्वारे असे निदेश देण्याचा प्राधिकार देण्यात आला आहे.
(४) समिती करील ते सर्व नियम संस्थेबाहेर प्रयोग करणाऱ्या व्यक्तींवर आणि ज्या संस्थेत प्रयोग करण्यात येत असतील त्या संस्थेच्या प्रभारी व्यक्तींवर बंधनकारक असतील.
——–
१. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम १४ द्वारा समाविष्ट करण्यात आले.