गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ९ :
परवानगी देण्याचा, नियंत्रण ठेवण्याचा आणि विनियमन करण्याचा केंद्र सरकारचा अधिकार :
१) कलम ८ च्या तरतुदींच्या अधीन राहून केंद्र सरकार नियमांद्वारे-
अ) पुढील गोष्टींची परवानगी देऊ शकेल व त्यांचे विनियमन कसा शकेल.
एक) कोका वनस्पतीची लागवड करणे किंवा त्या वनस्पतीचा कोणताही भाग गोळा करणे (अशी लागवड करण्याचे किंवा भाग गोळा करण्याचे काम फक्त केंद्र सरकारसाठी असले पाहिजे) किंवा कोका पानांचे उत्पादन करणे, ती कब्जात ठेवणे त्यांची विक्री, खरेदी, वाहतूक, आंतरराज्यीय आयात, आंतरराज्यीय निर्यात, वापर किंवा सेवन करणे.
दोन) अफूच्या झाडाची लागवड करणे (अशी लागवड करण्याचे काम फक्त केंद्र सरकारसाठी असले पाहिजे.)
तीन) अफूचे उत्पादन व निर्मिती करणे आणि अफूच्या गवताचे उत्पादन करणे.
चार) केंद्र सरकारच्या कारखान्यांतील अफूची किंवा अफूसाधित पदार्थांची (डिरायव्हेटिव्हज) भारतातून निर्यात करण्यासाठी विक्री करणे किंवा राज्य सरकारला किंवा निर्मिती करणाऱ्या औषधविक्रेत्यांना (केमिस) विक्री करणे.
पाच) (सिद्ध केलेल्या अफूव्यतिरिक्त इतर) निर्मित औषधी द्रव्यांची निर्मिती करणे.
परंतु यात औषधी वापरासाठीच्या अफूच्या निर्मितीचा किंवा एखादा उत्पादक जी सामग्री कब्जात ठेवण्यास कायद्याने हक्कदार असेल त्या सामग्रीपासून बनलेले कोणतेही निर्मित औषधी द्रव्य अंतर्भूत असलेल्या कोणत्याही सिद्धपदार्थाच्या निर्मितीचा समावेश होत नाही.
सहा) मनोव्यापारांवर परिणाम करणाऱ्या पदार्थांची निर्मिती करणे, ते कब्जात ठेवणे, त्यांची वाहतूक करणे, आंतरराज्यीय आयात करणे, आंतरराज्यीय निर्यात करणे, विक्री करणे, खरेदी करणे, त्यांचे सेवन करणे, त्यांचे सेवन करणे किंवा वापर करणे.
सात) गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ यांची भारतामध्ये आयात करणे, भारतातून निर्यात करणे व ते एका वाहनातून दुसऱ्या वाहनात भरणे.
ब) खंड (अ) मध्ये नमूद केलेल्या बाबींपैकी कोणत्याही बाबींवर केंद्र सरकारचे परिणामकारक नियंत्रण राहण्याच्या दृष्टीने आवश्यक असतील अशा इतर कोणत्याही गोष्टी ठरवून देऊ शकेल.
२) विशेषत: आणि या आधीच्या अधिकाराला बाध न येता अशा नियमांद्वारे पुढील गोष्टी करता येतील-
अ) अफूच्या झाडाच्या लागवडीसाठी ज्या सीमांच्या आत अनुज्ञाप्ती (लायसन्स) देता येतील त्या सीमा वेळोवेळी निश्चित करण्याचा अधिकार केंद्र सरकारला देणे.
ब) सर्व अफू, अफूच्या झाडाची लागवड केलेल्या जमिनीतील सर्व उत्पादन लागवडदारांनी, केंद्र सरकार याबाबत प्राधिकार देईल अशा अधिकाऱ्याच्या स्वाधीन करण्यास फर्मावणे.
क) अफूच्या झाडाची लागवड करण्यासाठी आणि अफूचे उत्पादन व निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या लायसन्सचे नमुने व त्यांच्या शर्ती, त्यासाठी आकारता येईल असे शुल्क, जी प्राधिकरणे अशा अनुज्ञाप्ती (लायसन्स) देऊ शकतील, रोखून ठेवू शकतील, नाकारू शकतील किंवा रद्द करू शकतील ती प्राधिकरणे आणि अनुज्ञाप्ती (लायसन्स) रोखून ठेवण्याबाबतच्या नाकारण्याबाबतच्या किंवा रद्द करण्याबाबतच्या आदेशांवर ज्या प्राधिकरणांकडे अपील करता येईल ती प्राधिकरणे, ठरवून देणे.
ड) केंद्र सरकार यासंबंधात प्राधिकार देईल असे अधिकारी, लागवडदार अफू स्वाधीन करण्यास येईल त्या वेळी त्या लागवडदाराच्या उपस्थितीत अफूचे वजन करतील, तपासणी करतील आणि तिचा दर्जा व सांद्रता यांनुसार तिची वर्गवारी करतील असे ठरवून देणे.
इ) लागवडदराने स्वाधीन केलेल्या अफूसाठी त्याला द्यावयाची किंमत वेळोवेळी निश्चित करण्याचा अधिकार केंद्र सरकारला देणे.
फ) कारखान्यामध्ये घेतलेल्या अफूचे वजन करणे, तपासणी करणे आणि तिचा दर्जा व सांद्रता यानुसार तिची वर्गवारी करणे आणि अशा तपासणीच्या निष्कर्षानुसार प्रमाण किमतीमध्ये कपात करणे किंवा तिच्यामध्ये भर (कोणतीही असल्यास) घालणे; वजन, तपासणी, वर्गीकरण, कपात किंवा भर यासंबंधीचे निर्णय घेणारी प्राधिकरणे, कपात किवा भर यासंबंधीचे निर्णय घेणारी प्राधिकरणे आणि अशा निर्णयांविरूद्ध ज्यांच्यकडे अपील करता येईल ती प्राधिकरणे – या सर्व गोष्टींसाठी तरतूद करणष.
ग) लागवडदाराने स्वाधीन केलेल्या अफूची केंद्र सरकारच्या कारखान्यात तपासणी केल्यानंतर तिच्यामध्ये भेसळ असल्याचे आढळून आल्यास, यासंबंधात प्राधिकार दिलेल्या अधिकाऱ्यांना ती जप्त करता येईल असे फर्माविणे.
ड) निर्मित औषधी द्रव्यांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या अनुज्ञप्ती (लायसन्स) नमुने व त्यांच्या शर्ती, जी प्राधिकरणे अशी लायसने देऊ शकतील ती प्राधिकरणे आणि त्या अनुज्ञप्ती (लायसन्स)साठी आकारता येईल ते शुल्क ठरवून देणे.
आय) मनोव्यापांरावर परिणाम करणाऱ्या पदार्थांची निर्मिती, कब्जा, वाहतूक, आंतरराज्यीय आयात, आंतरराज्यीय निर्यात, विक्री, खरेदी, सेवन किंवा वापर करण्यासाठी लागणाऱ्या अनुज्ञप्ती (लायसन्स) चे किंवा परवान्यांचे नमुने व त्यांच्या शर्ती आणि जी प्राधिकरणे अशा अनुज्ञप्ती (लायसन्स) किंवा परवाने देऊ शकतील ती प्राधिकरणे व त्या अनुज्ञप्ती (लायसन्स) साठी किंवा परवान्यांसाठी आकारता येईल ते शुल्क ठरवून देणे.
जे) ज्या बंदरांमध्ये आणि इतर ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या गुंगीकारक औषधी द्रव्यांची किंवा मनोव्यापारांवर परिणाम करणाऱ्या पदार्थांची भारतात आयात करता येईल किंवा भारतातून निर्यात करता येईल किंवा ते एका वाहनातून दुसऱ्या वाहनात भरता येतील ती बंदरे व इतर ठिकाणे; अशी आयात, निर्यात किंवा वाहनांतरण करण्यासाठी लागणारे दाखले, अधिकारपत्रे किंवा परवाने यांचे नमुने व त्यांच्या शर्ती; जी प्राधिकरणे असे दाखले, अधिकारपत्रे किंवा परवाने देऊ शकतील ती प्राधिकरणे आणि त्यांच्यासाठी आकारता येईल ते शुल्क ठरवून देणे.
