गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६८-ब :
व्याख्या :
या प्रकरणात संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसल्यास
अ) अपील प्राधिकरण म्हणजे कलम ६८ एन याअन्वये स्थापन करण्यात आलेल्या मालमत्तेसंबंधीचे अपील न्यायधिकरण,
ब) सहयोगी या प्रकरणान्वये ज्यांची मालमत्ता जप्त करण्यास पात्र आहे अशा व्यक्तींच्या बाबत सहयोगी म्हणजे
१) अशा व्यक्तीच्या निवासी जागेत (मांजरासह) राहत असेल किंवा जी सध्या राहते अशी व्यक्ती:
२) अशा व्यक्तीचे कामकाज पाहत असेल किंवा सध्या पाहते किंवा तिचे हिशेब ठेवीत असेल किंवा सध्या ठेवते अशी कोणतीही व्यक्ती,
३) ती व्यक्ती जिची सदस्य, भागीदार किंवा संचालक होती किंवा अशा व्यक्तींचा संघ, व्यक्तींचे मंडळ, भागीदारी संस्था किंवा कंपनी अधिनियम, १९५६ (१९५६ चा १) च्या अथानुसार खाजगी कंपनी;
४) अशी व्यक्ती उपखंड (तीन) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या व्यक्ती संघाची, व्यक्तींच्या मंडळाची, भागीदारी संस्थेची किंवा खाजगी कंपनीची सदस्य, भागीदार किंवा संचालक होती किंवा असेल अशा कोणत्याही वेळी अशा संघाची, मंडळाची, भागीदारी संस्थेची किंवा खाजगी कंपनीची सदस्य, भागीदारी किंवा सचालक होती किंवा असेल अशी कोणतीही व्यक्ती;
५) उपखंड (तीन) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्ती संघाचे, व्यक्तींच्या मंडळाचे, भागीदारी संस्थेचे किंवा खाजगी कंपनीचे कामकाज पाहत होती किंवा असेल आणि तिचे हिशेब पाहत होती किंवा असेल अशी कोणतीही व्यक्ती :
६) ज्याबाबतीत
१) अशा व्यक्तीने न्यास निर्माण केला असेल किंवा
२) ज्या तारखेला अंशदान करण्यात आले असेल त्या तारखेला न्यासाच्या रकमेत अशा व्यक्तीने केलेल्या अंशदानाच्या मत्तेची किंमत (जर यापूर्वी अंशदान करण्यात आले असेल, तर त्या अशंदानाच्या मत्तेच्या किंमतीसह) त्या तारखेला असलेल्या न्यासाच्या एकूण मत्तेच्या किंमतीच्या वीस टक्क्यांपेक्षा कमी नसेल अशा बाबतीत कोणत्याही न्यासाचा विश्वस्त व्यवस्थेचा विश्वस्त.
७) अशा व्यक्तीची कोणतीही मालमत्ता अशा व्यक्तीच्या वतीने अन्य कोणत्याही व्यक्तीने धारण केली आहे, असे सक्षम प्राधिकरणास लेखी नमूद करावयाच्या कारणावरून वाटेल तर अशी अन्य व्यक्ती;
क) सक्षम प्राधिकरण म्हणजे केंद्र सरकारने कलम ६८ड अन्वये प्राधिकृत केलेला केंद्र शासकीय अधिकारी
ड) लपवणूक म्हणजे, मालमत्तेचे स्वरूप, साधन, विनियोग, ने-आण किंवा मालकी लपवून ठेवणे किंवा त्याबाबत बतावणी करणे आणि त्यामध्ये अशा मालमत्तेची इलेक्ट्रॉनिक पारेषणाद्वारे किंवा अन्य कोणत्याही साधनांद्वारे ने-आण करण्याचा किंवा तिचे रूपांतर करण्याचा समावेश होतो.
ई) गोठवणे म्हणजे कलम ६८ फ अन्वये काढण्यात आलेल्या आदेशाद्वारे मालमत्तेचे हस्तांतरण, रूपांतर, विनियोग किंवा ने-आण यास तात्पुरती बंदी करणे असा आहे.
फ) ओळख पटवणे म्हणजे, ती मालमत्ता बेकायदेशीर व्यापारातून प्राप्त करण्यात आली असल्याचे किंवा वापरण्यात आली असल्याचे पुराव्याने सिद्ध करणे;
ग) बेकायदेशीरपणे संपादीत मालमत्ता म्हणजे, हे प्रकरण जिला लागू होते अशा व्यक्तीच्या बाबतीत
१) अशा व्यक्तीने या प्रकरणाच्या प्रारंभापूर्वी किंवा त्यानंतर (या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत किंवा) बेकायदेशीर व्यापारामधून प्राप्त केलेले किंवा मिळवलेले किंवा तिच्याशी संबंधित असलेले असे कोणतेही उत्पन्न प्राप्ती किंवा मत्ता यामधून किंवा त्याद्वारे पूर्णपणे किंवा अंशत: संपादित केलेली कोणतीही मालमत्ता किंवा
२) अशा व्यक्तीने या प्रकरणाच्या प्रारंभापूर्वी किंवा त्यानंतर मोबदल्यासाठी किंवा उपखंड (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही मालमत्तेशी संबंधित किंवा अशा मालमत्तेपासून मिळाले उत्पन्न किंवा कमाई यांच्याशी पूर्णत: किंवा अशंत: संबंधित अशा कोणत्याही अन्य साधनांद्वारे संपादित करण्यात आलेली अन्य कोणतीही मालमत्ता असा आहे. आणि त्यामध्ये –
ए) अशा व्यक्तीने धारण केलेली जी कोणतीही मालमत्ता अशी व्यक्ती किंवा त्या मालमत्तेच्या पूर्वीच्या कोणत्याही धारकानंतर कोणत्याही वेळी जिने मालमत्ता धारण केलेली असेल अशी कोणतीही अन्य व्यक्ती अथवा असे पूर्वीचे धारक दोन किंवा अधिक असतील अशा बाबतीत, अशा पूर्वीच्या धारकांपैकी शेवटचा धारक हा योग्य भरपाई साठी सद्भावपूर्वक हस्तांतरण करणारी व्यक्ती असेल किंवा होता असे नसल्यास, अशा पूर्वीच्या धारकाने ती धारण करण्याचे बंद केले नसते, तर या खंडान्वये जी त्या पूर्वीच्या धारकाच्या संबंधात बेकायदेशीररीत्या संपादन केलेली मालमत्ता ठरली असली अशी कोणतीही मालमत्ता;
बी) अशा व्यक्तीने मग ती प्रकरणाच्या प्रारंभी किंवा नंतर योग्य भरपाईपासाठी किंवा अन्य कोणत्या मार्गाने बाब (ए) खाली येणाऱ्या कोणत्याही मालमत्तेशी पूर्णपणे किंवा तिचा भाग संबंधित असेल अशी संपादित केलेली मालमत्ता किंवा अशा मालमत्तेमधून मिळविलेले उत्पन्न किंवा कमाई यांचा समावेश असेल.
ह) मालमत्ता म्हणजे कोणत्याही वर्णनाची मालमत्ता आणि मत्ता मग ती स्थावर असो वा जंगम असो आणि बेकायदेशीर व्यापारामधून मिळविलेल्या किंवा त्यामध्ये वापरलेल्या अशा मालमत्तेचे आणि मत्तेचे शीर्षक दर्शवणारे किंवा त्यामधील हितसंबंध दर्शवणारे दस्तऐवज किंवा कागदपत्रे;
आय) नातेवाईक म्हणजे
१) त्या व्यक्तीची पत्नी किंवा पती,
२) त्या व्यक्तीचा भाऊ किंवा बहीण,
३) त्या व्यक्तीच्या पत्नीचा किंवा पतीचा भाऊ किंवा बहीण,
४) त्या व्यक्तीचे कोणीही वंशपरंपरागत पूर्वज किंवा वंशज,
५) त्या व्यक्तीच्या पतीचे किंवा पत्नीचे वंशपरंपरेतील पूर्वज किंवा वंशज;
६) उपखंड (२), उपखंड (३), उपखंड (४) किंवा उपखंड (५) मध्ये निर्दिष्ट केलेल्या व्यक्तीची पत्नी किंवा पती,
७) उपखंड (२) किंवा उपखंड (३) मध्ये निर्दिष्ट केलेल्या व्यक्तीचा कोणताही वंशपरंपरांगत वंशज,
जे) मागोवा घेणे म्हणजे, मालमत्तेचे स्वरूप, साधन, विनियोग, ने-आण, हक्क किंवा मालकी निश्चित करणे,
के) विश्वस्तव्यवस्था या शब्दप्रयोगात अन्य कोणत्याही कायदेशरी बांधिलकीचा समावेश होतो.
