गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६३ :
सरकारजमा करण्याबाबतची कार्यपद्धती :
१) या अधिनियमाखालील अपराधाच्या न्यायचैकशीमध्ये आरोपी व्यक्तीला दोषी ठरविण्यात आलेले असो, दोषमुक्त करण्यात आलेले असो अथवा सोडून देण्यात आलेले असो या अधिनियमाखाली जप्त करण्यात आलेल्या कोणत्याही वस्तू किंवा बाबी कलम ६० किंवा कलम ६१ किंवा कलम ६२ अन्वये सरकारजमा करण्यास पात्र आहेत किंवा नाहीत याबाबत न्यायालयाने निर्णय केला पाहिजे आणि न्यायालयाने त्या गोष्टी सरकारजमा करण्यास पात्र ठरविले असल्यास, न्यायालय तसे आदेश त्यानुसार देऊ शकेल.
२) या अधिनियमान्वये जप्त करण्यात आलेल्या वस्तू किंवा गोष्टी कलम ६० किंवा कलम ६१ किंवा कलम ६२ अन्वये सरकारजमा करण्यास पात्र असल्याचे आढळून आले असेल, परंतु त्यासंबंधात अपराध करणारी व्यक्ती माहीत नसेल किंवा सापडण्याजोगी नसेल अशा बाबतीत न्यायालयाला त्याबाबतीत चौकशी पार पाडता येईल आणि त्याबाबतची जबाबदारी निश्चित करता येईल आणि त्यानुसार त्यांच्या सरकारजमा करण्याबाबतचे आदेश काढता येतील.
परंतु, वस्तू किंवा गोष्टी जप्त करण्यात आल्यापासून एक महिन्याचा कालावधी पूर्ण होईपर्यंत आणि त्यामध्ये हक्क सांगणारी कोणीही व्यक्ती असल्यास तिचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय आणि अशा हक्कांच्या संबंधात ती सादर करील असा पुरावा असल्यास तो घेतल्याशिवाय सरकारजमा करण्याबाबतचा आदेश काढण्यात येता कामा नये.
परंतू, आणखी असे की, गुंगीकारक औषधी द्रव्य, मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ, १.(नियंत्रीत पदार्थ), अफूची झाडे, कोका वनस्पती किंवा कॅनबी वनस्पती यांखेरीज अशी कोणतीही गोष्टी किंवा वस्तू जलद व नैसर्गिकपणेच नाश पावणारी असेल अशा बाबतीत त्या गोष्टीची विक्री करणे हे तिच्या मालकाच्या हिताचे ठरेल असे न्यायालयाचे मत असेल अशा बाबतीत, ते कोणत्याही वेळी तिच्या विक्रीचे आदेश देऊ शकेल; या पोट कलमाच्या तरतुदी जास्तीत जास्त जितक्या लागू करता येतील तितक्या प्रमाणात अशा विक्रीच्या उत्पन्नाच्या बाबतीत लागू करण्यात आल्या पाहिजेत.
३) २.(***)
———-
१. २००१ चा अधिनियम क्रमाकं ९ याच्या कलम २९ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २००१ चा अधिनियम क्रमाकं ९ याच्या कलम २९ अन्वये मूळ मजकूर वगळण्यात आला.
