मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ९ :
चालकाचे लायसन मंजूर करणे :
१) चालकाचे लायसन धारण करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी अपात्र ठरविण्यात आली नसेल अशा कोणत्याही व्यक्तीला,
एक) ती सर्वसाधारणपणे जेथे राहते किंवा व्यवसाय करते; किंवा
दोन) ज्यामध्ये ती मोटार वाहन चालविण्याचे शिक्षण घेत आहे किंवा तिने ते घेतले आहे अशी कलम १२ मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेली शाळा किंवा आस्थापना जिथे आहे,
१.(राज्यामध्ये कोणत्याही लायसन प्रधिकाऱ्यास आवेदन (अर्ज) करता येइल.)
२) पोट-कलम (१) मधील प्रत्येक अर्ज केंद्र शासनाकडून विहित करण्यात येईल, अशा नमुन्यात असावा आणि त्यासोबत विहित करण्यात येईल अशी फी व अशी कागदपत्रे असली पाहिजेत.
२.(३) अर्जदार केंद्र शासनाकडून विहित करण्यात येईल अशी चाचणी उत्तीर्ण झाला, तर त्याला चालकाचे लायसन देण्यात येईल:
परंतु,
(a)क) अ) (एक) अर्जदाराने अशा वर्गाचे वाहन चालविण्याचे लायसन यापूर्वी धारण केलेले असेल आणि त्या लायसनचा समाप्तीचा दिनांक आणि अर्जाचा दिनांक यांमधील कालावधी पाच वर्षांपेक्षा अधिक नेसल; किंवा
दोन) अर्जदार कलम १८ खालील अशा वर्गाचे वाहन चालविण्याचे लायसन धारण करीत आहे किंवा त्याने ते पूर्वी धारण केलेले होते; किंवा
तीन) अर्जदार भारताबाहेरील कोणत्याही देशाच्या सक्षम प्राधिकरणाने दिलेले अशा वर्गाचे वाहन चालविण्याचे लायसन धारण करीत आहे, असे दर्शविणारा पुरावा अर्जदाराने सादर केला असेल, अशा बाबतीत अर्जदार कलम ८ च्या पोट-कलम (३) च्या तरतुदींचे पालन करील या शर्तींच्या अधीनतेने त्याला अशी चाचणी देण्याची आवश्यकता असणार नाही.
(b)ख) ब) अर्जदाराने वाहन चालविले असता लोकांना धोका निर्माण होण्याचा संभव असेल अशी कोणतीही अपात्रता अर्जदारामध्ये नसेल, आणि त्या प्रयोजनासाठी लायसन देणाऱ्या प्राधिकरणाला, अर्जदाराला कलम ८, पोट-कलम (३) मध्ये निर्दिष्ट करण्यात आले असेल अशा नमुन्यात आणि अशा रीतीने वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्यात फर्माविता येईल :
३.(परंतु आणखी असे की, एखादे रुपांतरित यान (अॅडप्टेड वाहन) चालवण्यासाठी चालकाचे लायसन जारी (मान्य) करेल जर अशी लायसन प्राधिकाऱ्याची खात्री पटली की असे मोटर यान चालवण्यास उपयुक्त आहे.)
४) परिवहन वाहन चालविण्यासाठीचा लायसनसाठी अर्ज करण्यात आला असेल अशा बाबतीत,४. (***) कलम १२ मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या शाळेने किंवा अस्थापनेने दिलेले चालकाचे प्रमाणपत्र असल्याशिवाय अशी प्राधिकृती देण्यात येता कामा नये.
५.(५) एखादा अर्जदार चाचणीमध्ये उत्तीर्ण झाला नसेल, तर सात दिवसांच्या कालावधीनंतर त्याला पुन्हा चाचणी देण्याची परवानगी देण्यात येईल:
परंतु असे की, अर्जदार तीन वेळा चाचणी देऊनसुद्धा उत्तीर्ण होऊ शकला नाही, तर अशा शेवटच्या चाचणीनंतर साठ दिवसांचा कालावधी समाप्त होईपर्यंत पुन्हा अशी चाचणी देण्यास तो पात्र ठरणार नाही ६.(आणी अशा अर्जदारास कलम १२ अन्वये कोणत्याही शाळा किवा आस्थापनाकडून उपचारात्मक ड्रायव्हिंग प्रशिक्षण कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे.) )
६) अर्ज ज्या प्रकारच्या वाहनाच्या संबंधात करण्यात आला असेल, अशाच प्रकारच्या वाहनाद्वारे चाचणी घेण्यात येईल.
परंतु, गिअर असलेली मोटार सायकल चालविण्याच्या चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेली व्यक्ती गिअर नसलेली मोटार सायकल चालविण्याच्या चाचणीमध्ये उत्तीर्ण झाली आहे असे मानण्यात येईल.
७) योग्य त्या लायसन देणाऱ्या प्राधिकरणाकडे रीतसर अर्ज करण्यात आला असेल, आणि अर्जदाराने आपण वाहन चालविण्यास सक्षम असल्याबद्दल लायसन देणाऱ्या प्राधिकरणाचे समाधान केले असेल अशा बाबतीत अर्जदार त्या वेळी चालकाचे लायसन धारण करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी अपात्र ठरला नसल्यास लायसन देणारे प्राधिकरण अशा अर्जदारास लायसन देईल.
परंतु, लायसन देणारे प्राधिकरण हे समुचित प्राधिकरण नसले तरीही अर्जदाराने तो समुचित प्राधिकरणाकडे अर्ज करण्यास असमर्थ असल्यास योग्य व पुरेशी कारणे होती. याबाबत त्या प्राधिकरणाचे समाधान केले असल्यास ते प्राधिकरण अशा अर्जदाराला चालकाचे लायसन देऊ शकेल :
आणखी असे की, अर्जदाराने यापूर्वीच चालकाचे लायसन धारण केले असेल, तर त्या लायसनची दुसरी प्रत मिळण्यास तो असमर्थ असण्याची योग्य व पुरेशी कारणे असल्याखेरीज लायसन देणाऱ्या प्राधिकरणाने त्याला चालकाचे नवीन लायसन देता कामा नये.
८) अर्जदाराला आपली बाजू मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर अर्जदार हा-
(a)क) अ) सराईत गुन्हेगार आहे किंवा तो सराईत दारूड्या आहे; किंवा
(b)ख) ब) गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर प्रभाव करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (१९८५ चा ६१) याच्या अर्थानुसार कोणत्याही गुंगीकारक औषधाच्या किंवा मनोव्यापारावर प्रभाव करणा?्या पदार्थांच्या आहारी गेलेला आहे; किंवा
(c)ग) क) जिचे चालकाचे लायसन यापूर्वी कोणत्याही वेळी काढून घेण्यात आले होते अशी व्यक्ती आहे.
याबाबत लायसन देणाऱ्या प्राधिकरणाचे समाधान झाले असल्यास असे प्राधिकरण, कारणे लेखी नमूद करून अशा व्यक्तीस चालकाचे लायसन देण्यास नकार देणारा आदेश काढू शकेल आणि लायसन देणाऱ्या प्राधिकरणाने या पोट-कलमान्वये दिलेल्या आदेशामुळे बाधा पोहोचलेल्या व्यक्तीला, तो आदेश मिळाल्यापासून तीस दिवसांच्या आत विहित प्राधिकरणाकडे अपील करता येईल.
९) या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी अमलात असलेले मोटार सायकल चालविण्याचे कोणतेही लायसन, गिअर असलेली किंवा नसलेली मोटार सायकल चालविण्यासाठी अमलात असल्याचे मानण्यात येईल.
७.(१०) या कलमात काहीही असले तरी ई-गाडी किंवा ई-रिक्षा चालविण्याचे ड्रायव्हिंग लायसन्स विहित केलेल्या पद्धतीने आणि अटींच्या अधीन राहून देण्यात येईल.)
———-
१. २०१९ चा ३२ कलम ५ द्वारा बदली समाविष्ट करण्यात आले.
२. १९९४ चा अधिनियम क्रं. ५४ कलम ७ द्वारा बदली समाविष्ट करण्यात आले.
३. २०१९ चा ३२ कलम ५ द्वारा दुसऱ्या परंतुका ऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. २०१९ चा ३२ कलम ५ द्वारा केंद्र शासनाने विहित केली असेल अशी किमान शैक्षणिक पात्रता असल्याशिवाय आणि हे शब्द वगळण्यात आले.
५.१९९४ चा अधिनियम क्रं. ५४ कलम ७ द्वारा बदली समाविष्ट करण्यात आले.
६. २०१९ चा ३२ कलम ५ द्वारा समाविष्ट करण्यात आले.
७. २०१५ चा अधिनियम सं. ३ कलम ४ द्वारा (०७-०१-२०१५ रोजी व तेव्हापासून) समाविष्ट करण्यात आले.