मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ९९ :
राज्य परिवहन उपक्रमाच्या मार्ग परिवहन सेवासंबंधीचा प्रस्ताव तयार करणे व प्रसिद्ध करणे :
१.(१)) कार्यक्षम, पर्याप्त, किफायतशीर आणि योग्य रीतीने समान्वित केलेली मार्ग परिवहन सेवा पुरविण्यासाठी, कोणतेही क्षेत्र किंवा मार्ग किंवा त्याचा भाग यांच्याशी संबंधित अशा मार्ग परिवहन सेवा सर्वसाधारणपणष किंवा अशा सेवांचा कोणताही वर्ग लोकहिताच्या दृष्टीने राज्य परिवहन उपक्रमाने चालविणे किंवा प्रचलित करणे आवश्यक आहे मग ते अन्य व्यक्तींना पूर्णपणे किंवा अंशत: वगळून असो अथवा अन्य प्रकारे असो-असे राज्य शासनाचे मत असल्यास राज्य शासन, देण्याचे प्रस्तावित करण्यात आलेल्या सेवेचे स्वरूप, तिच्या व्याप्तीचे प्रस्ताविक क्षेत्र किंवा नियत मार्ग आणि त्यासंबंधीचा इतर तपशील देणाऱ्या योजनेसंबंधीचा प्रस्ताव तयार करील आणि तो तयार करणाऱ्या राज्याच्या शासकीय राजपत्रात व अशश योजनेच्या व्यप्तीत आणण्याचे प्रस्तावित केले असेल, अशा क्षेत्रात किंवा नियत मार्गाच्या ठिकाणी प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक भाषेतील कमीत कमी एका वर्तमानपत्रात आणि तो प्रस्ताव तयार करण्याऱ्या राज्य शासनाला योग्य वाटेल अशा अन्य पद्धतीने तो प्रसिद्ध करण्यात येईल.
१.(२) पोट-कलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले, तरीही त्या पोट-कलमान्वये प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला, तो प्रस्ताव प्रलंबित असेपर्यंत देण्यात येणाऱ्या तात्पुरत्या परवान्याखेरीज अन्य कोणताही परवाना देण्यात येणार नाही असा तात्पुरता परवाना, तो देण्यात आल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या कालावधीपर्यंत किंवा कलम १०० नुसार योजना अंतिमरित्या प्रसिद्ध करण्यात येईपर्यंत यापैकी जो आधीचा असेल, अशा कालावधीपर्यंत कायदेशीर राहील.)
——–
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम ३० अन्वये कलम ९९ ला त्या कलमाचे पोटकलम (१) असा क्रमांक देण्यात आला व पोटकलम (२) समाविष्ट करण्यात आला.