मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ८२ :
परवान्याचे हस्तांतरण :
१) पोट-कलम (२) मध्ये तरतूद केली आहे त्याव्यतिरिक्त एरवी, ज्या परिवहन प्राधिकरणाने परवाना दिलेला असेल, त्याच्या परवानगीवाचून तो परवाना एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे बदली करता येणार नाही आणि परवान्याच्या कक्षेत येणारे वाहन ज्या व्यक्तीकडे हस्तांतरीत करण्यात आले असेल, त्या व्यक्तीला अशा परवानगी व्यतिरिक्त, परवान्याद्वारे प्राधिकृत करण्यात आलेल्या रीतीने ते वाहन वापरण्याचा कोणताही अधिकार त्या परवान्यामुळे दिला जाणार नाही.
२) परवाना धारकाचा मृत्यू होईल, तेव्हा परवान्याच्या कक्षेत येणाऱ्या वाहनाचा ताबा ज्या व्यक्तीकडे येईल त्या व्यक्तीलाच जणू काही तो परवाना दिलेला असावा अशा प्रकारे ती व्यक्ती तीन महिन्यापर्यंत त्या परवान्याचा वापर करू शकेल:
परंतु, ज्याने परवाना दिलेला असेल त्या परिवहन प्राधिकरणाला अशा व्यक्तीने धारकाच्या मृत्यूपासून तीस दिवसाच्या आत, धारक मरण पावल्याचे व परवाना वापरण्याचा तिचा उद्देश असल्याचे कळविलेले असेल पाहिजे:
परंतु आणखी असे की, कोणताही परवाना मृत धारकाकडे असता, तर ज्या दिनांकास त्याचे नवीकरण न केल्यामुळे तो अमलात राहीला नसता त्या दिनांकानंतर त्या परवान्याचा असा वापर करता येणार नाही.
३) परवानाधारक मरण पावल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत परिवहन प्राधिकरणाकडे अर्ज करण्यात आल्यास ते प्राधिकरण, परवाना लागू असलेल्या वाहनांचा ताबा त्यानंतर ज्या व्यक्तीकडे जाईल त्या व्यक्तीकडे तो परवाना हस्तांतरीत करू शकेल;
परंतु, अर्जदाराला पुरेशा व सबळ कारणामुळे तीन महिन्यांच्या सदर कालावधीत अर्ज करता आला नव्हता, याबद्दल परिवहन प्राधिकरणाची खात्री पटल्यास त्याला नमूद करण्यात आलेल्या कालावधीनंतर करण्यात आलेला अर्ज स्वीकारता येईल.