मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ५८ :
परिवहन वाहनांच्या संबंधातील विशेष तरतुदी :
१) (मोटार कॅब सोडून) अन्य परिवहन वाहनांच्या चाकांना लावलेल्या टायरांची संख्या, स्वरूप व आकारमान आणि त्यांची घडण, मॉडेल व अन्य संबंद्ध बाबी विचारात घेऊन, केंद्र सरकार, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, परिवहन वाहनाच्या प्रत्येक घडणीच्या व मॉडेलच्या संबंधात अशा वाहनाचे १.(कमाल एकूण वाहन वजन) व अशा वाहनाच्या प्रत्येक अक्षबंधाचे कमाल सुरक्षित अक्षबंध वजन विहित करता येईल.
२) मोटार कॅबखेरीज अन्य परिवहन वाहनांची नोंदणी करतेवेळी, नोंदणी प्राधिकरण नोंदणी अभिलेखात व तसेच वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रामध्येदेखील पुढीलप्रमाणे तपशील नमूद करील-
(a)क) अ) वाहनाचे भाररहित वजन;
(b)ख्न) ब) प्रत्येक चाकाला लावलेल्या टायरांची संख्या, स्वरूप व आकारमान;
(c)ग) क) वाहनाचे एकूण वाहन वजन आणि त्याच्या विभिन्न अक्षबंधासंबंधीचे नोंदलेले अक्षबंधजन, आणि
(d)घ) ड) ते वाहन फक्त उतारूंची ने-आण करण्यासाठी किंवा मालासोबत उतारूंची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येत असेल किंवा तसा वापर करण्याच्या दृष्टीने अनुकूल बदल करवून घेतला असेल तर ज्यांची सोय करण्यात आलेली आहे अशा उतारूंची संख्या, आणि वाहनाच्या मालकाला तो तपशील वाहनावर विहित पद्धतीने प्रदर्शित करावा लागेल.
३) नोंदणी प्रमाणपत्रामध्ये, अशा कोणत्याही वाहनाची घडण व मॉडेल आणि त्याच्या चाकांना लावलेल्या टायरांची संख्या, स्वरूप व आकारमान यासंबंधात पोट-कलम (१) खालील अधिसूचनेत जे विनिदिॅष्ट केले असेल त्यापेक्षा भिन्न असे कोणतेही वाहन वजन किंवा कोणत्याही अक्षबंधाचे अक्षबंध वजन, नोंदता येणार नाही.
परंतु, पोट-कलम (१) खालील अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट केलेल्यापेक्षा अधिक अवजड वजनांच्या विवक्षित प्रकारच्या वाहनांसाठी विशिष्ट वसतिस्थानामध्ये परवानगी देण्यात यावी असे केंद्र सरकारचे मत झाल्यास, या पोट-कलमातील तरतुदी, आदेशामध्ये विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा फेरबदलांसह लागू होतील असे शासकीय राजपत्रातील आदेशाद्वारे केंद्र सरकार निदेश देऊ शकेल.
४) २.(***)
५) नोंदणी प्रमाणपत्रामध्ये नोंदलेल्या एकूण वाहन वजनामध्ये पोट-कलम (३) च्या तरतुदींनुसार सुधारणा करता यावी या दृष्टीने, नोंदणी प्राधिकरण, परिवहन वाहनाच्या मालकास, विहित करता येईल, अशा कार्यपद्धतीनुसार नोंदणी प्राधिकरणाकडून विनिर्दिष्ट करण्यात येईल, अशा मुदतीच्या आत नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक करू शकेल.
——–
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम १८ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २००० चा अधिनियम क्रमांक २७ याच्या कलम ३ अन्वये वगळण्यात आले.