मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ४९ :
राहण्याच्या किंवा व्यवसायाच्या जागेतील बदल:
१) मोटार वाहनाचा मालक वाहनाच्या नोंदणीपत्रात नमूद केलेल्या जागेत राहिनासा झाला किंवा ती त्याची कामधंद्याची जागा राहिली नाही तर, पत्यात असा कोणताही बदल झाल्यापासून तीस दिवसांच्या आत तो आपला नवीन पत्ता केन्द्र शासनाकडून विहित करण्यात आले असेल अशा नमुन्यात आणि अशा कागदपत्रांसह, ज्याने नोंदणी प्रमाणपत्र दिले त्या नोंदणी प्राधिकरणास किंवा १.(नवीन पत्ता हा जर अन्य राज्य नोंदणी प्राधिकरणाच्या अधिकारितेत असेल तर अशा अन्य नोंदणी प्राधिकरणास कळवील.) आणि त्याचवेळी, नवीन पत्ता नोंदणी प्रमाणपत्रात नमूद व्हावा यासाठी ते नोंदणी प्रमाणपत्र तो नोंदणी प्राधिकरणाकडे पाठवील.
(1A)२.(१अ) पोटकलम (१) खाली, योग्य त्या नोंदणी प्राधिकरणाकडे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक माध्यमासह अशी कागदपत्रे केन्द शासन विहित करेल अशा पद्धतीने सत्यतेचा पुराव्यासह पाठवेल.)
२) मोटार वाहनाच्या मालकाने आपला नवा पत्ता पोटकलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या मुदतीत नोंदणी प्राधिकरणास कळविण्यात कसूर केली तर, त्या प्रकरणाची परिस्थिती लक्षात घेऊन नोंदणी प्राधिकरण मालकाविरुद्ध कलम १७७ अन्वये जी कारवाई करता येईल त्याऐवजी त्या मालकास पोटकलम (४) अन्वये विहित करण्यात येईल त्याप्रमाणे जास्तीत जास्त ३.(पाचशे) रुपये इतकी रक्कम भरण्यास फर्मावू शकेल :
परंतु, मालकाने उक्त रक्कम भरण्यास कसूर केल्यास कलम १७७ अन्वये त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
३) एखाद्या व्यक्तीने पोटकलम (२) अन्वये रक्कम भरली असेल तेव्हा तिच्याविरुद्ध कलम १७७ अन्वये कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
४) पोटकलम (२) च्या प्रयोजनांसाठी, राज्य शासन, त्या व्यक्तीच्या नवीन पत्त्यातील बदल कळविण्याबाबत झालेल्या विलंबाचा कालावधी लक्षात घेऊन वेगवेगळ्या रकमा विहित करु शकेल.
५) पोटकलम (१) अन्वये माहिती मिळाल्यानंतर, नोंदणी प्राधिकरण, त्याला योग्य वाटेल अशी पडताळणी केल्यानंतर, नवीन पत्ता नोंदणी प्रमाणपत्रात नोंदवून घेण्याची व्यवस्था करु शकेल.
६) अशी कोणतीही नोंद करणारे मूळ नोंदणी प्राधिकरणाहून अन्य असे नोंदणी प्राधिकरण मूळ नोंदणी प्राधिकरणास बदलेला पत्ता कळवील.
७) नोंदणी प्रमाणपत्रात नमूद केलेल्या पत्त्यात, जी अनुपस्थिती सहा महिन्यांहून अधिक काळ टिण्याचे उद्देशित नाही अशा तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे बदल व्हावयाचा असेल किंवा मोटार वाहन वापरण्यात आले नसेल व नोंदणी प्रमाणपत्रात नमूद केलेल्या पत्त्याच्या ठिकाणाहून हलविण्यातही आहे नसेल तर, पोटकलम (१) मधील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २० अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २० अन्वये समाविष्ट करण्यात आले.
३. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २० अन्वये शंभर रुपये याऐवजी समाविष्ट करण्यात आले.