Mv act 1988 कलम २५ : पृष्ठांकन बदलणे व पृष्ठांकनविरहित चालकाचे लायसन देणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २५ :
पृष्ठांकन बदलणे व पृष्ठांकनविरहित चालकाचे लायसन देणे :
१) कोणत्याही चालकाच्या लायसनवरील पृष्ठांकन, तो लायसनधारक पृष्ठांकनविरहित चालकाचे लायसन मिळण्यास या कलमाच्या तरतुदींअन्वये हक्कदार होईपर्यंत त्याने प्राप्त केलेल्या कोणत्याही नवीन लायसनवर किंवा त्याच्या दुसऱ्या प्रतीवर ते पृष्ठांकन दाखल करण्यात येईल.
२) एखाद्या चालकाच्या लायसनवर पृष्ठांकन करणे आवश्यक असेल आणि ते लायसन ज्याने पृष्ठांकन करावयाचे त्या न्यायालयाच्या किंवा प्राधिकरणाच्या ताब्यात नसेल तर-
(a)क) अ) जिच्या संबंधात पृष्ठांकन करावयाचे आहे ती व्यक्ती त्यावेळी चालकाचे लायसन धारण करीत असल्यास, त्या व्यक्तीने पाच दिवसात किंवा न्यायालय किंवा प्राधिकरण निश्चित करील अशा अधिक कालावधीत त्या न्यायालयाला किंवा प्राधिकरणाला सादर केले पाहिजे; किंवा
(b)ख) ब) चालकाच्या लायसनचा धारक नसताना तिने नंतर चालकाचे लायसन धारण केल्यास, चालकाचे लायसन प्राप्त केल्यानंतर पाच दिवसात तिने ते न्यायालयाला किंवा प्राधिकरणाला सादर केले पाहिजे,
आणि विनिर्दिष्ट कालावधीत चालकाचे लायसन सादर करण्यात आले नाही, तर असा कालावधी समाप्त झाल्यानंतर पृष्ठांकनाच्या प्रयोजनासाठी सादर करण्यात येईपर्यंत ते प्रभावी असणार नाही.
३) जिच्या चालकाच्या लायसनवर पृष्ठांकन करण्यात आले असेल, अशा व्यक्तीच्या बाबतीत, जर अशा पृष्ठांकनानंतर सलग तीन वर्षांच्या कालावधीमध्ये तिच्याविरूद्ध आणखी पृष्ठांकन करण्यात आले नसेल तर, तिचे चालकाचे लायसन परत केल्यानंतर आणि पाच रूपये फी भरल्यानंतर पृष्ठांकन विरहित नवे चालकाचे लायसन मिळण्यास ती हक्कदार असेल;
परंतु, कलम ११२ मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याच्या बाबतचे पृष्ठांकन असेल तर, अशा पृष्ठांकनाच्या तारखेपासून एक वर्षाचा कालावधी समाप्त झाल्यानंतर असे पृष्ठांकन नसलेले नवीन चालकाचे लायसन मिळण्यास ती व्यक्ती हक्कदार असेल;
परंतु, असेही की, अनुक्रमे सदर तीन वर्षांचा आणि एक वर्षाचा कालावधी मोजताना सदर व्यक्तीला चालकाचे लायसन धारण करण्यास किंवा प्राप्त करण्यास ज्या कलावधीमध्ये अपात्र ठरविण्यात आले असेल, असा कालावधी त्यामधून वगळण्यात येईल.

Leave a Reply