मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २३ :
अपात्रता आदेशाचा परिणाम :
१) कलम १९ किंवा कलम २० अन्वये जिच्या संबंधात अपात्रता आदेश काढण्यात आलेला असेल अशा व्यक्तीला अशा आदेशामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या मर्यादेपर्यंत आणि अशा कालावधीत चालकाचे लायसन धारण करण्यास किंवा प्राप्त करण्यास मनाई करण्यात येईल आणि अशा व्यक्तीने त्या आदेशाच्या तारखेला कोणतेही लायसन धारण केले असल्यास तो अशा मर्यादेपर्यंत आणि अशा कालवधीसाठी परिणामकारक असण्याचे बंद होईल.
२) कलम २० खाली काढण्यात आलेल्या अपात्रता आदेशाचे प्रवर्तन, अशा आदेशाविरूद्धचे किंवा असा आदेश ज्याच्या परिणामी काढण्यात आला असेल, त्या दोषारोपाविरूद्धचे अपील प्रलंबित असतानाच्या काळात अपील न्यायालयाकडून तसे निदेश देण्यात आलेले नसतील, तर निलंबित किंवा स्थगित असणार नाही.
३) जिच्याविरूद्ध कोणताही अपात्रता आदेश काढण्यात आलेला आहे अशा कोणत्याही व्यक्तीला आदेशाच्या दिनांकापासून सहा महिन्यांचा कालावधी समाप्त झाल्यानंतर कोणत्याही वेळी आदेश काढणाऱ्या न्यायालयाकडे किंवा अन्य प्राधिकरणाकडे अपात्रता काढून टाकण्यासाठी अर्ज करता येईल आणि न्यायालयाला किंवा यथास्थिति प्राधिकरणाला सर्व परिस्थिती विचारात घेऊन एकतर तो अपात्रता आदेश रद्द करता येईल किंवा त्यात बदल करता येईल :
परंतु, न्यायालयाने किंवा अन्य प्राधिकरणाने या कलमाखालील कोणताही अपात्रता आदेश रद्द करण्यास किंवा त्यात बदल करण्यास नकार दिल्यास अशा नाकारण्याच्या तारखेपासून तीन महिन्यांचा कालावधी समाप्त होईपर्यंत त्याखालील दुसरा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.