मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १५७ :
१.( विमाप्रमाणपत्राचे हस्तांतरण :
१) या प्रकरणाच्या उपबंधानुसार ज्या व्यक्तीच्या नावे विमाप्रमाणपत्र देण्यात आले आहे अशी व्यक्ती मोटार वाहनाशी संबंधित विमापत्रासह आहे त्या वाहनाची मालकी इतर व्यक्तीकडे हस्तांतरित करील त्याबाबतीत, विमाप्रमाणपत्र व त्या विमाप्रमाणपत्रात वर्णिलेले विमापत्र हे जिच्या नावे मोटार वाहन हस्तांतरित केले आहे त्या व्यक्तीच्या नावे त्या मोटार वाहनाच्या हस्तांतरणाच्या दिनांकापासून हस्तांतरित झाले असल्याचे मानण्यात येईल.
स्पष्टीकरण :
शंकानिरसनार्थ, याद्वारे असे जाहीर करण्यात येते की, अशा मानवी हस्तांतरणामध्ये उक्त विमाप्रमाणपत्र आणि विमापत्र यांच्या अधिकारांच्या व दायित्वांच्या हस्तांतरणाचाही समावेश असेल.
२) हस्तांतरिती हस्तांतरणाच्या दिनांकापासून चौदा दिवसांच्या आत विमाप्रमाणपत्रात आणि विमाप्रमाणपत्रात वर्णिलेल्या विमापत्रात त्याच्या नावे हस्तांतरण केल्याबद्दलचा आवश्यक तो बदल करण्यासाठी विहित नमुन्यात विमाकराकडे अर्ज करील आणि विमाकार विमाहस्तांतरणाशी संबंधित प्रमाणपत्रात आणि विमापत्रात आवश्यक ते बदल करील.)
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५१ अन्वये मूळ प्रकरण ११ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.