मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १२७ :
सार्वजनिक ठिकाणी सोडून दिलेले किंवा चालकविरहित असलेले मोटार वाहन हलविणे :
१.(१) कोणतेही मोटार वाहन एखाद्या सार्वजनिक ठिकाणी दहा तास किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी सोडून देण्यात किंवा चालकाविना ठेवण्यात आलेले असेल, अशा बाबतीत अधिकारिता असणाऱ्या गणवेशधारी पोलीस अधिकाऱ्याने वाहन खेचून नेण्याच्या सेवेद्वारे ते तेथून हलविणे किंवा चाक खेचून किंवा कोणत्याही प्रकारे ते न चालता येण्याजोग्या स्थितीत ठेवणे अधिकृत असेल.)
२) एखाद्या सोडून दिलेल्या, चालकविरहित असलेल्या, मोडलेल्या, जळालेल्या किंवा अर्धवट उघडून ठेवलेल्या वाहनाच्या १.(सार्वजनिक ठिकाणच्या) स्थितीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असेल किंवा ते त्या ठिकाणी असण्यामुळे वाहतुकीत व्यत्यय निर्माण होत असेल, अशा बाबतीत अधिकारिता असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने वाहन खेचून नेण्याच्या सेवेमार्फत ते १.(सार्वजनिक ठिकाणाहून) तात्काळ हलविणे हे अधिकृत असेल.
३) एखादे वाहन पोलीस अधिकाऱ्याने हलविणे हे पोट-कलम (१) किंवा पोटकलम (२) अन्वये अधिकृत असेल, अशा बाबतीत अन्य कोणत्याही दंडाशिवाय वाहन खेचून नेण्याचा सर्व खर्च देण्यास त्या वाहनाचा मालक जबाबदार असेल.
——–
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम ३७ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.