मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १०० :
प्रस्तावाला आक्षेप :
१) एखाद्या योजनेसंबंधीचा कोणताही प्रस्ताव शासकीय राजपत्रात आणि अशा प्रस्तावात अंतर्भूत क्षेत्रात किंवा मार्गावर प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक भाषेतील किमान एका वर्तमानपत्रात तो प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर तो शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत कोणत्याही व्यक्तीला राज्य शासनाकडे आक्षेप सादर करता येतात.
२) राज्य शासन, आक्षेप विचारात घेतल्यांनतर आणि आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीला किंवा त्याच्या प्रतिनिधीला आणि राज्य परिवहन उपक्रमाच्या प्रतिनिधीला आपली बाजू मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर त्याला तसे करणे योग्य वाटल्यास त्याला मान्यता देऊ शकते किंवा त्यात फेरफार करू शकते.
३) पोट-कलम (२) नुसार मान्य करण्यात किंवा फेरबदल करण्यात आलेल्या प्रस्तावाशी संबंधित योजना अशी योजना तयार करणारे राज्य शासन शासकीय राजपत्रात आणि अशा योजनेत अंतर्भूत असलेल्या क्षेत्रात किंवा मार्गावरील क्षेत्रात प्रसारित होणाऱ्या किमान एका प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्रात प्रसिद्द करील आणि त्यांनतर ती शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्याच्या तारखेपासून अंतिम होईल आणि तिला मान्य करण्यात आलेली योजना असे म्हणण्यात येईल आणि ती ज्या क्षेत्राशी आणि मार्गाशी संबंधित असेल, त्याला अधिसूचित क्षेत्र किंवा अधिसूचित मार्ग असे म्हणण्यात येईल.
परंतु असे की, कोणत्याही आंतर-राज्य मार्गाशी संबंधित असलेली अशी कोणतीही योजना तिला केंद्र शासनाची पूर्व मंजुरी असल्याशिवाय, मान्य करण्यात आलेली योजना म्हणून मानण्यात येणार नाही.
४) या कलमात काहीही अंतर्भूत असले तरी पोट-कलम (१) नुसार योजनेशी संबंधित प्रस्ताव शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या कालावधीत पोट-कलम (३) खालील मान्य करण्यात आलेली योजना म्हणून शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली नाही, तर तो प्रस्ताव व्यपगत झाल्याचे मानण्यात येईल.
स्पष्टीकरण :
या पोट-कलमात निर्दिष्ट करण्यात आलेला एक वर्षाचा कालावधी मोजताना, कोणत्याही न्यायालयाच्या स्थगन आदेशामुळे किंवा मनाई आदेशामुळे पोट-कलम (३) खालील मान्य करण्यात आलेली योजना प्रसिद्ध करण्याचे ज्या कोणत्याही कालावधीसाठी रोखण्यात आली असेल तो कालावधी वगळण्यात येईल.