बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ९३ :
मानसिकदृष्ट्या ग्रस्त असलेल्या किंवा अल्कोहोल किंवा इतर अंमली पदार्थांच्या व्यसनी बालकास स्थलांतरीत करणे :
१) या अधिनियमातील तरतुदीनुसार विशेष गृहात किंवा निरीक्षण गृहात किंवा बालगृहात किंवा संस्थेत ठेवलेले बालक, मानसिक आजाराने ग्रस्त किंवा अल्कोहोल किंवा वर्तनावर परिणाम करणाऱ्या इतर अंमली पदार्थांचे व्यसनी असल्याचे समिती किंवा मंडळाच्या निदर्शनास येईल, तेव्हा सदर समिती किंवा मंडळ सदर बालकास मानसिक आरोग्य अधिनियम, १९८७ (१९८७ चा १४) मधील तरतुदीनुसार मानसोपचार रुग्णालय किंवा मानसिक उपचार केंद्रात दाखल करण्याचे आदेश देईल.
२) पोट-कलम (१) अन्वये मानसोपचार केंद्रात किंवा मानसिक उपचार केंद्रात दाखल केलेल्या बालकाबाबत उपचार समाप्ती प्रमाणपत्र दिलेल्या सल्ल्यानुसार, व्यसनींकरिता असलेल्या एकत्रित पुनर्वसन केंद्रात किंवा राज्य सरकारने चालविलेल्या मानसिक आजाराने ग्रस्त व अंमली पदार्थांच्या व्यसनींसाठी असलेल्या पुनर्वसन केंद्रात आवश्यक तेवढ्या कालावधीसाठी बालकास स्थानांतरीत करण्याचे आदेश समिती किंवा मंडळ देईल.
स्पष्टीकरण :
या पोटकलमाच्या प्रयोजनासाठी, –
क) व्यसनींसाठी एकत्रित पुनर्वसन केंद्र या संज्ञेस केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाच्या केंद्रीय विभागीय दारुबाजी व अंमली पदार्थ व्यसन प्रतिबंध आणि सामाजिक सुरक्षा सेवासाठी केन्द्रीय क्षेत्र सहायता योजनेमध्ये दिलेला अर्थ अभिप्रेत आहे.
ख) मानसिकदृष्ट्या ग्रस्त व्यक्ती या संज्ञेचा अर्थ, मानसिक आरोग्य अधिनियम, १९८७ (१९८७ चा १४) च्या कलम २ च्या खंड (ठ) मध्ये दिलेला अर्थ अभिप्रेत आहे.
ग) मानसोपचार रुग्णालय आणि मानसिक उपचार केंद्र ही संज्ञेचा अर्थ, मानसिक आरोग्य अधिनियम, १९८७ (१९८७ चा १४) च्या कलम २ च्या खंड (थ) मध्ये दिलेल्या अर्थ अभिप्रेत आहे.