बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ७६ :
बालकास भिक मागणास वापरणे :
१) जी व्यक्ती बालकास भीक मागण्यासाठी वापरेल किंवा बालकास भीक मागायला लावील त्या पाच वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची आणि एक लाख रुपये इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकेल :
परंतु असे की, भीक मागण्यासाठी कोणी व्यक्ती बालकाचा अवयव कापेल किंवा बालकास अपंग करील तर त्या व्यक्तीस सात वर्षापेक्षा कमी नसेल परंतु दहा वर्षांपर्यंत वाढू शकेल एवढ्या सश्रम (कठोर) कारावासाची आणि पाच लाख रुपये एवढ्या दंडाची शिक्षा होऊ शकेल.
२) जर एखादी व्यक्ती तिच्या प्रत्यक्ष ताब्यात किंवा नियंत्रणाखाली असलेल्या बालकाच्या संदर्भात पोट-कलम (१) मध्ये नमूद अपराधास सहाय्य करील तर सदर व्यक्ती ही पोट-कलम (१) मध्ये नमूद शिक्षेस पात्र ठरेल आणि सदर व्यक्ती कलम २ च्या खंड (१४) च्या उपखंड (पाच) अन्वये अपात्र समजली जाईल :
परंतु असे की, सदर बालक, कोणत्याही परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन केलेले बालक समजले जाणार नाही आणि सदर इसमाच्या ताब्यातून किंवा नियंत्रणातून काढून घेतले जाईल आणि योग्य पुनर्वसनासाठी समितीसमोर हजर केले जाईल.