बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ६५ :
विशेष दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्था :
१) राज्य सरकार, प्रत्येक जिल्ह्यात एक किंवा जास्त संस्था किंवा संघटनांना, अधिकृतरित्या दत्तकविधान नियंत्रण नियमावलीत ठरवून दिलेल्या पद्धतीने अनाथ, सोडून दिलेल्या किंवा ताब्यात दिलेल्या बालकांच्या, दत्तकविधान (दत्तक ग्रहण) व संस्थाविरहित पुनर्वसनाच्या उद्देशाने विशेष दत्तकविधान संस्था म्हणून जाहीर करील.
२) राज्य संस्था अशा विशेष दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्थेला मान्यता दिल्यावर किंवा मान्यतेचे नूतनीकरण केल्यावर त्वरित सदर संस्थेचे नाव, पत्ता आणि संपर्काचा तपशील, मान्यतेचे पत्र किंवा प्रमाणपत्राच्या प्रतीसह प्राधिकरणास माहिती देईल.
३) राज्य सरकार वर्षातून किमान एकदा सर्व विशेष दत्तकविधान संस्थांची तपासणी करील व आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत आदेश देईल.
४) जर एखादी विशेष दत्तक ग्रहण संस्था, या अधिनियमात नमूद केलेली पावले उचलण्यात किंवा अधिकृत दत्तकविधान (दत्तक ग्रहण) नियंत्रण संस्थेच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात कमी पडल्यास किंवा एखादे अनाथ, सोडलेल्या किंवा ताब्यात दिलेल्या बालकास दत्तकविधानासाठी (दत्तक ग्रहण) मुक्त करु शकली नाही किंवा प्रस्तावित दत्तक पालकांचा गृह निरीक्षण अहवाल पूर्ण करु शकली नाही किंवा ठराविक मुदतीत १.(जिल्हा दंडाधिकाऱ्याकडून) दत्तक ग्रहण आदेश मिळवू शकली नाही, तर अशा विशेष दत्तक ग्रहण संस्थेस रुपये पन्नास हजार पर्यंत दंडाची शिक्षा केली जाऊ शकेल, आणि दंडाची रक्कम न भरल्यास राज्य शासन विशेष दत्तक ग्रहण संस्थेची मान्यता रद्द करील.
——–
१. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम २४ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट केले.