बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ४५ :
प्रायोजकता (स्पॉन्सरशिप) :
१) व्यक्तिगत बालकांचे – व्यक्तिगत प्रायोजकत्व, सामूहिक प्रायोजकत्व अशा बालकांच्या विविध प्रकारचे प्रायोजकत्व स्विकारण्याच्या योजनांबाबत राज्य सरकार आवश्यक नियम तयार करील.
२) बालकांच्या प्रायोजकत्वाच्या निकषांमध्ये खालील निकषांचा समावेश असेल, –
एक) जेथे माता विधवा, घटस्फोटित किंवा परित्यक्ता महिला असेल;
दोन) जेथे मुले अनाथ असतील व दूरच्या नातेवाईकांच्या आश्रयाला असतील;
तीन) जेथे माता-पित्यांना जीवघेरा दुर्धर आजार असेल.
चार) जेथे माता-पिता अपघातामुळे अपंग झालेले असतील आणि शारीरिक व आर्थिकदृष्ट्या बालकांचे संगोपन करण्यास असमर्थ असतील.
३) प्रायोजकत्वाचा कालावधी ठरवून दिल्याप्रमाणे असेल.
४) प्रायोजकत्व योजनांच्या अंतर्गत कुटूंबांना, बालकगृहांना, विशेष आश्रयगृहांना, बालकांच्या वैद्यकीय, आहार, शैक्षणिक आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी व बालकांचा जीवनदर्जा सुधारण्याच्या दृष्टीने अतिरिक्त आधार दिला जाऊ शकेल.