बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ३० :
समितीची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या :
बाल कल्याण समितीची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे असतील,-
एक) त्यांच्या समक्ष हजर करण्यात आलेल्या बालकांची दखल घेणे आणि त्यांचा स्वीकार करणे;
दोन) या अधिनियमान्वये बालकांच्या संरक्षण आणि कल्याणा संबंधित आणि त्यावर परिणाम करतील अशा सर्व प्रकरणात चौकशी करणे;
तीन) बाल कल्याण अधिकारी आणि बाल परीविक्षा अधिकारी तसेच जिल्हा बाल संरक्षण केन्द्र किंवा अशासकीय सेवाभावी संघटना यांना सामाजिक चौकशी व तपास करुन अहवाल सादर करण्याबाबत आदेश देणे;
चार) देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालकांच्या देखभालीसाठी एखादी व्यक्ती योग्य असल्याबाबत जाहीर करण्यासाठी चौकशी करणे;
पाच) पोषण आणि देखरेखीसाठी, अभिरक्षेसाठी देण्याबाबत आदेश देणे;
सहा) बालकांच्या, बालकाची देखभाल, संरक्षण, योग्य पुनर्वसन याची आवश्यकता असलेल्या बालकाच्या व्यक्तीगत काळजीच्या योजनेसंबंधात खात्री करणे आणि बालकाचे मातापिता, पालक किंवा सुयोग्य व्यक्ती किंवा सुरक्षा गृह यांची पुनर्योजना करणे, याकरिता आवश्यक निदेश पारित करणे;
सात) संस्था सहाय्याची आवश्यकता असलेल्या बालकाचे वय, लिंग, शारीरिक कमतरता आणि गरजा याबाबत लक्ष पुरवून, योग्य संस्थेची सदस्यक्षमता विचारात घेऊन नोंदणीकृत संस्थेच्या ताब्यात बालकास सोपविणे;
आठ) देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालकांची निवास व्यवस्था असलेल्या संस्थांना महिन्यातून किमान दोनवेळा भेटी देऊन व पाहणी करुन आवश्यक सुधारणांसंबंधात जिल्हा बाल सुरक्षा केन्द्राकडे आणि राज्य शासनाकडे शिफारसी सादर करणे;
नऊ) बालकांना अभिरक्षेत सोपविण्याबाबत मातापित्यांनी पालकांनी दिलेली पत्रे प्रमाणित करणे व तत्पूर्वी मातापित्यांना पुनर्विचाराची पुरेशी संधी देऊन कुटूंब एकसंध राहील याबाबत जास्तीत जास्त प्रयत्न करणे;
दहा) सोडून दिलेल्या किंवा हरवलेल्या बालकांना आवश्यक कारवाई करुन कुटूंबाकडे पुन्हा सोपविण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेल्याची खात्री करणे;
अकरा) आवश्यक त्या चौकशीनंतर अनाथ, ताब्यास दिलेली किंवा सोडून दिलेली बालके दत्तक देण्यायोग्य असल्याबाबत जाही करणे;
बारा) देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या परंतु समितीसमक्ष हजर न केलेल्या बालकांबाबत स्वरंस्फूर्तपणे निर्णय घेणे व अशा बालकांपर्यत पोहोचणे, मात्र असा स्वयंस्फूर्त निर्णय किमान तीन सदस्यांनी घेणे आवश्यक आहे;
तेरा) लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या आणि देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेले बालक म्हणून समितीसमक्ष हजर केलेल्या बालकाबाबत कारवाई करुन अशा बालकांबाबत बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ (२०१२ चा ३२) अन्वये परिस्थितीनुरुप विशेष बालरक्षा पोलीस किंवा स्थानिक पोलिसांच्या संरक्षणात देऊन पुनर्वसन करणे;
चौदा) कलम १७ च्या पोटकलम (२) अन्वये मंडळाकडून पाठविण्यात आलेल्या प्रकरणात आवश्यक कारवाई करणे;
पंधरा) पोलीस, श्रम विभाग आणि बालकांची काळजी आणि संरक्षण या संदर्भात जिल्हा बाल संरक्षण केन्द्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने काम करणाऱ्यास इतर संस्थांशी समन्वय राखणे;
सोळा)कोणत्याही बाल संगोपन केन्द्रातील बालकाबाबत झालेल्या दुव्र्यवहाराबाबत तक्रार आल्यास समिती चौकशी करील आणि यथास्थिति, पोलीस, जिल्हा बाल संरक्षण केन्द्र किंवा श्रम विभाग किंवा बाल रक्षा संस्था यांना आवश्यक ते आदेश देईल;
सतरा) बालकांसाठी आवश्यक त्या विधी व न्याय सेवा उपलब्ध करुन देणे;
अठरा) अशी विहित केल्याप्रमाणे इतर आवश्यक कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या;