बाल न्याय अधिनियम २०१५
कलम १८ :
कायद्याचे उल्लंघन करताना आढळणाऱ्या बालकाबाबत दिलले आदेश :
१) जर चौकशीअंती, कोणत्याही वयाच्या बालकाने किरकोळ स्वरुपाचा किंवा गंभीर स्वरुपाचा अपराध केला आहे किंवा १६ वर्षे वयापेक्षा कमी वयाच्या बालकाने निर्घृण स्वरुपाचा अपराध केला आहे असे मंडळाचे मत झाले तर १.(किंवा सोळा (१६) वर्षापेक्षा जास्त वयाच्या बालकाने जघन्य अपराध केला आहे आणि मंडळाने कलम १५ अन्वये प्रारंभिक मुल्यांकन केल्यानंतर प्रकरण निकाली काढले आहे) तर, त्या त्यावेळी अमलात असणाऱ्या कोणत्याही कायद्यात यापेक्षा काहीही नमूद असले तरी, अपराधाच्या स्वरुपावरुन, पर्यवेक्षण किंवा हस्तक्षेपाची विशेष गरज असल्याचे सामाजिक अन्वेषणाच्या अहवालावरुन आणि बालकाच्या भूतकाळातील वर्तनावरुन, मंडळास योग्य वाटल्यास मंडळ, –
क) बालकास आवश्यक सल्ला किंवा समज देऊन तसेच सदर बालक व त्याचे माता-पिता किंवा पालक यांची चौकशी व समुपदेशन करुन आदेशित करुन घरी सोडेल;
ख) बालकास सामूहिक समुपदेशन आणि तत्सम कार्यक्रमात भाग घेण्याचा सल्ला देईल;
ग) बालकास एखाद्या संस्थेच्या किंवा संघटनेच्या किंवा विशिष्ट व्यक्तीच्या किंवा व्यक्तींच्या किंवा मंडळाने ठरविलेल्या व्यक्तींच्या समुहाच्या देखरेखीकाली समाजसेवा करण्याबद्दल आदेश देईल;
घ) बालकास, त्याच्या माता-पित्यांना किंवा पालकांना दंड भरण्याबाबत आदेश देईल :
परंतु जर सदर बालक काम करते असेल, तर त्यावेळी अमलात असलेल्या कोणत्याही कामगार अधिनियमाच्या तरतुदींचा भंग होत नसल्याबाबत खात्री केली जाईल;
ङ) सदर बालकास चांगल्या वर्तणुकीच्या परिवीक्षेवर सोडण्याच्या आणि माता-पित्याच्या, पालकांच्या किंवा एखाद्या सुयोग्य व्यक्तीच्या देखभालीत मुचलक्यासह किंवा मुचलक्याशिवाय बंधपत्रासह देण्याचे आदेश देतील, सदर चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्राची मुदत तीन वर्षापेक्षा जास्त नसेल;
च) बालकाला चांगल्या वर्तणुकीच्या परिवीक्षेवर सोडण्याचे आणि चांगल्या वर्तणुकीची आणि बालकाच्या कल्याणाची खात्री करण्यासाठी एखाद्या योग्य संस्थेच्या संगोपन आणि देखरेखीखाली, तीन वर्षापेक्षा जास्त नाही, अशा वास्तव्याच्या कालावधीसाठी पाठविण्याचे आदेश देतील;
छ) बालकाला तीन वर्षापेक्षा जास्त नसेल या कालावधीसाठी, जसे ते आवश्यक समजतील, शिक्षण, कौशल्य विकास, समुपदेशन, वर्तनुक परिवर्तन उपचार आणि मानसशास्त्रीय आधार पुरविण्यासाठी, विशेष गृहात पाठविण्याचे आदेश देतील :
परंतु जर बालकाची वर्तणुक, त्याच्या स्वत:च्या आणि सदर बालगृहातील इतर बालकाच्या कल्याणासाठी योग्य नसल्यास मंडळ अशा बालकास सुरक्षित ठिकाणी पाठविण्याचे आदेश देईल.
२) जर पोटकलम (१) मधील खंह (क) ते खंड (छ) अन्वये आदेश देण्यात आला असल्यास, मंडळ त्याव्यतिरिक्त खालील बाबतीत आदेश देऊ शकेल,-
एक) शाळेत जाण्याबाबत; किंवा
दोन) व्यवसाय प्रशिक्षण केन्द्रात जाण्याबाबत; किंवा
तीन) उपचार केन्द्रात जाण्याबाबत; किंवा
चार) एखाद्या ठराविक जागी जाण्यास, तेथे हजर राहण्यास किंवा प्रतिबंध करण्याबाबत; किंवा
पाच) व्यसनमुक्तीचा उपचार पूर्ण करण्याबाबत.
३) जेव्हा कलम १५ अन्वये प्राथमिक पडताळणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, मंडळ सदर बालक पौढ झाल्याचा अभिप्राय देऊन खटल्याच्या सुनावणीची आवश्यकता असल्याचे नमूद करुन प्रकरण अपराधाच्या सुनावणीचे अधिकार असलेल्या बाल न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याचा आदेश देईल.
——–
१. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम ८ द्वारा समाविष्ट केले.