बाल न्याय अधिनियम २०१५
कलम १४ :
कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकाबाबत मंडळाकडून चौकशी :
१) जेव्हा, कायद्याचे उल्लंघन केल्याचा सांय असलेल्या बालकास मंडळासमक्ष हजर केले जाते तेव्हा मंडळ या अधिनियमातील तरतुदींनुसार त्या बालकाबाबत चौकशी करेल आणि सदर बालकाबाबत कलम १७ आणि १८ अन्वये आवश्यक आदेश पारित करेल.
२) या कलमाच्या अधीन चौकशी, बालकास मंडळासमक्ष हजर केल्याच्या दिनांकापासून चार महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केली जाईल, सदर प्रकरणाची पाश्र्वभूमी विचारात घेऊन व कारणे लेखी स्वरुपात नमूद करुन मंडळ सदर चौकशीची कायमर्यादा कमाल दोन महिन्यांची वाढवू शकेल.
३) निर्घृण स्वरुपाच्या अपराधाच्या संदर्भात, कलम १५ अन्वये मंडळ, प्राथमिक चौकशी, बालकास सर्वप्रथम मंडळासमक्ष हजर केल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यात पूर्ण करील.
४) जर मंडळाद्वारा, किरकोळ (छोटे) स्वरुपाच्या अपराधातील पोटकलम (२) खालील चौकशी वाढीव कालावधीनंतरही अनिर्णित राहिल्यास, सदर चौकशी बंद केली जाईल :
परंतु गंभीर किंवा निर्घृण स्वरुपाच्या संदर्भात, मंडळास चौकशी पूर्ण करण्यासाठी अधिक मुदतवाढ आवश्यक असल्यास परिस्थितीनुरुप मुख्य न्याय दंडाधिकारी किंवा मुख्य महानगर दंडाधिकारी, कारणे लेखी स्वरुपात नमूद करुन मुदतवाढ देऊ शकतील.
५) न्याय्य (निष्पक्ष) आणि शीघ्र (त्वरित) चौकशीसाठी मंडळ खालीलप्रमाणे उपाय करील (पावले उचलेल), अर्थात् :-
क) चौकशी प्रारंभ करताना, मंडळ सदर कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकाविरुद्ध पोलीसांनी किंवा वकील किंवा परिवीक्षा अधिकारी किंवा इतर कोणी व्यक्तीने गैरवर्तन केलेले नाही, याबाबत खात्री करुन घेईल आणि तसे गैरवर्तन झालेले असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी उपाय करील;
ख) या अधिनियमाच्या अधीन सर्व प्रकरणात, कारवाई शक्य तितक्या साधेपणाने आणि ज्या बालकाविरुद्ध चौकशी केली जात आहे, त्या बालकास खेळीमेळीच्या वातारवणात ठेवून केली जाईल;
ग) मंडळासमक्ष हजर केलेल्या प्रत्येक बालकास त्याची बाजू मांडण्याची आणि कारवाईमध्ये सहभागी होण्यास संधी दिली जाईल;
घ) किरकोळ अपराधाची प्रकरणे मंडळाकडून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) मध्ये नमूद केलेल्या संक्षिप्त कारवाई प्रमाणे संपविली जाईल;
ङ) गंभीर स्वरुपाच्या प्रकरणातील कारवाई मंडळ फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) मध्ं; नमूद केलेल्या समन्स केसच्या (प्रकरणाच्या) कार्यपद्धतीप्रमाणे संपवील.
च) निर्घृण स्वरुपाच्या अपराधात,
एक) अपराध घडला तेव्हा, १६ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या बालकाच्या संदर्भात मंडळ सदर चौकशी वर नमूद खंड (ङ) प्रमाणे संपवील;
दोन) अपराध घडला तेव्हा, १६ पेक्षा जास्त वय असलेल्या बालकाच्या संदर्भात, सदर कारवाई कलम १५ च्या तरतुदींप्रमाणे केली जाईल.