JJ act 2015 कलम १० : कायद्याचे उल्लंघन केल्याचा संशय असलेल्या बालकास ताब्यात घेणे :

बाल न्याय अधिनियम २०१५
प्रकरण ४ :
कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकांबाबत वापरण्याची प्रक्रिया :
कलम १० :
कायद्याचे उल्लंघन केल्याचा संशय असलेल्या बालकास ताब्यात घेणे :
१) ज्यावेळी कायद्याचे उल्लंघन केल्याचा संशय असलेल्या बालकास पोलीस ताब्यात घेतील, त्यावेळी तात्काळ सदर बालकास विशेष बाल पोलीस पथकाच्या किंवा नामनिर्देशित बाल कल्याण अधिकाऱ्याच्या ताब्यात दिले जाईल व ते वळ न घालवता, बालकास ताब्यात घेतल्याच्या जागेपासून प्रवासाचा कालावधी वगळता २४ तासाच्या आत मंडळासमोर हजर करतील :
परंतु कोणत्याही परिस्थितीत, कायद्याचे उल्लंघन केल्याचा संशय असलेल्या बालकास, पोलीस कोठडीत किंवा कारागृहात ठेवले जाणार नाही.
२) राज्य सरकार या अधिनियमास सुसंगत असतील असे नियम बनवेल, –
एक) ज्यांच्या मार्फत, कायद्याचे उल्लंघन केल्याचा संशय असलेल्या बालकास मंडळासमोर हजर केले जाईल अशा व्यक्ती (यात नोंदणीकृत स्वयंसेव किंवा अशासकीय संघटनांचा अंतर्भाव असेल) उपलब्ध करुन देणे;
दोन) कायद्याचे उल्लंघन केल्याचा संशय असलेल्या बालकास, यथास्थिती, कोणत्या पद्धतीने आवश्यकतेनुसार निरीक्षणगृहात किंवा सुरक्षित ठिकारी पाठविले जाईल ते ठरवून देणे.

Leave a Reply