भारतीय दंड संहिता १८६०
प्रकरण १० :
लोकसेवकांच्या कायदेशीर प्राधिकाराच्या अवमानांविषयी :
कलम १७२ :
समन्सची बजावणी किंवा इतर कार्यवाही टाळण्यासाठी फरारी होणे :
(See section 206 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवकाकडून होणारी समन्सची बजावणी किंवा इतर कार्यवाही टाळण्यासाठी फरारी होणे.
शिक्षा :१ महिन्याचा साधा कारावास किंवा ५०० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
———–
अपराध : जर समन्सद्वारे किंवा नोटीशीद्वारे न्यायालयात हजर राहणे, इत्यादी आवश्यक केले असेल तर.
शिक्षा :६ महिन्याचा साधा कारावास किंवा १००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
———-
लोकसेवक म्हणून समन्स, नोटीस किंवा आदेश काढण्यास विधित: (कायद्याने) सक्षम असलेल्या अशा कोणत्याही लोकसेवकाकडून निघालेले असे समन्स नोटीस अगर आदेश यांची आपल्यावर होणारी बजावणी टाळण्यासाठी जो कोणी फरारी होईल त्यास एक महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची, किंवा पाचशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील;
किंवा जर असे समन्स, नोटीस किंवा आदेश न्यायालयात जातीने किंवा अभिकत्र्यामार्फत (एजंटातर्फे) हजर राहण्याविषयी अथवा एखादा १.(दस्तऐवज किंवा इलेट्रॉनिक अभिलेख हजर करण्याविषयी असेल तर) त्याला, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या साध्या कारावासाची, किंवा एक हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
———-
१. २०००चा अधिनियम क्र.२१, कलम ९१ द्वारे मूळ मजकुराऐवजी घातला. १७ ऑक्टोबर २००० पासून.