भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४ :
१.(परकिय क्षेत्रातील (अतिरिक्त प्रादेशिक) गुन्ह्यास भारतीय दंड संहिता लागू असणे :
(See section 1(5) of BNS 2023)
२.(या संहितेच्या तरतुदी पुढील व्यक्तींनी केलेल्या अपराध्यांनी लागू असतील-
(१) भारताच्या कोणत्याही नागरिकाने भारताखेरीज आणि भारताबाहेरील कोणत्याही ठिकाणी केलेला अपराध.
(२) कोणत्याही व्यक्तीने भारतात नोंदणी केलेल्या जहाजावर किंवा विमानात मग ते कोठेही असताना असो केलेला अपराध;)
३.(३) कोणत्याही व्यक्तीने, भारताखेरीज आणि भारताबाहेरील कोणत्याही ठिकाणाहून भारतात स्थापित असलेल्या संगणक साधनसामग्रीला लक्ष्य ठरवून केलेला अपराध.)
स्पष्टीकरण :
या कलमात
(क) अपराध या शब्दामध्ये जी कृती ४.(भारतात) केली असती तर या संहिते अन्वये शिक्षेस पात्र ठरली असती अशा प्रकारच्या ५.(भारताबाहेर) केलेल्या प्रत्येक कृतीचा समावेश होतो;
(ख)संगणक (कम्प्युटर) साधनसामग्री या संज्ञेला माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० याच्या कलम २ च्या पोटकलम (१) च्या खंड (के) मध्ये जो अर्थ नेमून दिला असेल तोच अर्थ असेल.
६.(उदाहरण) :
७.(***)
क ८.(हा ९.(भारताचा नागरिक) असून) युगांडामध्ये खून करतो. ४.(भारतात) जेथे तो सापडेल अशा कोणत्याही स्थळी खुनाबद्दल त्याची संपरीक्षा व दोषसिद्धी केली जाऊ शकते.
१०.(***)
—————————-
१. १८९८ चा अधिनियम ४ कलम २ द्वारे मूळ कलमाऐवजी घातले.
२. अनुकूलन आदेश १९५० द्वारे खंड (१) ते (४) ऐवजी घातले.
३. माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००८ (२००९ चा १०) कलम ५१ अद्वारे घातला (२७-१०-२००९ पासून)
४. क्रमश: अनुकूलन आदेश १९४८, अनुकूलन आदेश १९५० आणि १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची यांद्वारे ब्रिटिश इंडिया हा मजकूर वरीलप्रमाणे विशोधित करण्यात आलेला आहे.
५. क्रमश: अनुकूलन आदेश १९३७, अनुकूलन आदेश १९४८, अनुकूलन आदेश १९५० आणि १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची यांद्वारे उक्त राज्यक्षेत्रांच्या मर्यादांच्या बाहेर हा मजकूर वरीलप्रमाणे विशोधित करण्यात आले आहे.
६. १९५७ चा अधिनियम ३६ – कलम ३ व अनुसूची २ यांद्वारे उदाहरणे या ऐवजी घातले.
७. १९५७ चा अधिनियम ३६ – कलम ३ व अनुसूची २ याद्वारे (क) हे अक्षर व कोष्टक गाळले.
८. अनुकूलन आदेश १९४८ याद्वारे नेटिव्ह इंडियाचा प्रजाजन असलेला हमाल याऐवजी घातले.
९. अनुकूलन आदेश १९५० याद्वारे भारतीय अधिवास असलेला ब्रिटिश प्रजाजन याऐवजी घातले.
१०. अनुकूलन आदेश १९५० द्वारे उदाहरणे (ख), (ग) व (घ) गाळली.