भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४१२ :
दरोडा घालताना चोरलेली मालमत्ता अप्रामाणिकपणे स्वीकारणे:
(See section 317(3) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : चोरीची मालमत्ता ती दरवड्याद्वारे मिळवण्यात आली असल्याचे माहीत असताना अप्रमाणिकपणे स्वीकारणे.
शिक्षा :आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
जो कोणी दरोडा घातल्याने जिचा कब्जा हस्तांतरित झाला असल्याचे स्वत:ला माहीत असेल, किंवा तसे समजण्यास स्वत:ला कारण असेल अशी कोणतीही चोरीची मालमत्ता अप्रामाणिकपणे स्वीकारील किंवा ठेवून घेईल अथवा जी चोरीस गेल्याचे स्वत:ला माहीत असेल, किंवा तसे समजण्यास स्वत:ला कारण असेल अशी मालमत्ता, जी व्यक्ती दरोडेखोरांच्या टोळीपैकी असल्याचे स्वत:ला माहीत असेल, किंवा तसे समजण्यास स्वत:ला कारण असेल अशा व्यक्तीकडून अप्रामाणिकपणे स्वीकारील त्याला १.(आजन्म कारावासाची) किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
——–
१. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची याद्वारे जन्मठेप काळेपाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.