भारतीय दंड संहिता १८६०
प्रकरण १७ :
मालमत्तेच्या (संपत्तीच्या) विरोधी अपराधांविषयी :
चोरीविषयी :
कलम ३७८ :
चोरी:
(See section 303 of BNS 2023)
जो कोणी कोणत्याही व्यक्तीच्या कब्जातून कोणतीही जंगम मालमत्ता, त्या व्यक्तीच्या संमतीवाचून अप्रामाणिकपणे घेऊन जाण्याच्या उद्देशाने, तशी ती घेता यावी यासाठी स्थानभ्रष्ट करतो, त्याला तो चोरी करतो असे म्हटले जाते.
स्पष्टीकरण १ :
जंगम मालमत्ता नसलेली एखादी वस्तू भूमीशी संलग्न असेतोपर्यंत चोरीची विषयवस्तू नसते; पण ती भूमीपासून विलग करण्यात आली की, लगेच चोरीची विषयवस्तू होऊ शकते.
स्पष्टीकरण २:
ज्या कृतीमुळे विलगीकरण होईल त्या योगे घडणारी स्थानभ्रष्टता ही चोरी असू शकेल.
स्पष्टीकरण ३:
एखाद्या व्यक्तीने एखादी वस्तू स्थानभ्रष्ट होण्यास प्रतिबंध करणारा अडथळा दूर केल्यास, किंवा ती अन्य कोणत्याही वस्तूपासून वेगळी केल्यास व त्याचप्रमाणे ती प्रत्यक्षपणे हलवल्यास, त्यामुळे ती वस्तू स्थानभ्रष्ट होण्यास ती व्यक्ती कारण झाली असे म्हटले जाते.
स्पष्टीकरण ४ :
जी व्यक्ती कोणत्याही साधनाद्वारे एखाद्या प्राण्यास स्थानभ्रष्ट करते ती त्या प्राण्यास स्थानभ्रष्ट करते व अशा प्रकारे निर्माण झालेल्या गतीच्या परिणामी त्या प्राण्याकडून जी वस्तू हलविण्यात येते त्या प्रत्येक वस्तूला ती व्यक्ती स्थानभ्रष्ट करते, असे म्हटले जाते.
स्पष्टीकरण ५ :
व्याख्येमध्ये निर्दिष्ट केलेली संमती स्पष्ट किंवा उपलक्षित असू शकेल आणि ज्या व्यक्तीकडे कब्जा असेल ती व्यक्ती किंवा त्या प्रयोजनार्थ स्पष्ट किंवा उपलक्षित प्राधिकार असलेली कोणतीही व्यक्ती ती संमती देऊ शकेल.
उदाहरणे :
क) (य) च्या जमिनीतील झाड (य) च्या संमतीवाचून अप्रामाणिकपणे (य) च्या कब्जातून घेऊन जाण्याच्या उद्देशाने (क) ते झाड तोडतो. याबाबतीत, झाड अशाप्रकारे नेता यावे यासाठी (क) ने ते तोडले की, लगेच (क) ने चोरी केली असे होते.
ख) कुत्र्यांना आमिष दाखवण्यासाठी (क) स्वत:च्या खिशात काही वस्तू ठेवतो, व अशाप्रकारे (य) च्या कुत्र्याला मागोमाग येण्यास प्रवृत्त करतो. या बाबतीत (य) च्या संमतीवाचून अप्रामाणिकपणाने (य) च्या कब्जातून कुत्रा घेऊन जाण्याचा (क) चा उद्देश असल्यास, (य) चा कुत्रा (क) च्या मागोमाग जाऊ लागला की, (क) ने चोरी केली असे होते.
ग) (क) ला ऐवजाने भरलेली पेटी वाहून नेत असलेला बैल दिसतो, तो ऐवज अप्रामाणिकपणाने घेऊन जाण्यासाठी तो त्या बैलाला विशिष्ट दिशेने हाकतो. बैल चालू लागला की, (क) ने ऐवजाची चोरी केली असे होते.
घ) (क) हा (य) चा नोकर असून (य) ची मूल्यवान भांडी सांभाळण्याचे काम (य) ने (क) कडे सोपावले असून, (क) हा (य) च्या संमतीवाचून अप्रामाणिकपणाने मूल्यवान् भांडी घेऊन पळून जातो. (क) ने चोरी केली आहे.
ङ) (य) प्रवासाला निघाला असून, तो (क) या वखारपालकाकडे आपली मूल्यवान भांडी आपण प्रवासाहून परत येईपर्यंत सांभाळण्यासाठी देतो. (य) ती मूल्यवान भांडी सोनाराकडे नेऊन विकतो. याबाबतीत, ती मूल्यवान भांडी (य) च्या कब्जात नव्हती. त्याअर्थी ती (य) च्या कब्जातून घेतली जाण्याची शक्यता नव्हती आणि म्हणून (क) ने फौजदारीपात्र न्यासभंग केलेला असला तरी चोरी केली असे होत नाही.
च) (क) ला (य) च्या ताब्यातील घरामध्ये टेबलावर (य) ची आंगठी मिळते. याबाबतीत आंगठी (य) च्या कब्जात आहे आणि (क) ने ती अप्रामाणिकपणाने हलवली असेल तर, (क) ने चोरी केली असे होते.
छ) (क) ला भर रस्त्याववर कुणाच्याही कब्जात नसलेली आंगठी पडलेली मिळते. ती (क) ने घेतल्यामुळे त्याने मालमत्तेच्या फौजदारीपात्र अपहार केलेला असला तरी त्याने चोरी केली असे होत नाही.
ज) (य) च्या घरामध्ये (य) ची आंगठी टेबलावर असल्याचे (क) पहातो. आपली झडती घेतली गेल्यास आपण सापडू या भीतीने (क) ला आंगठीचा ताबडतोब अपहार करण्याचे धाडस न झाल्यामुळे तो ती आंगठी अशा ठिकाणी लपवतो की ती (य) ला केव्हाही सापडणे अत्यंत असंभवनीय आहे. उद्देश हा की, ती हरवल्याचा विसर पडल्यानंतर आंगठी जेथे लपविली त्या जागेमधून ती आंगठी काढून विकावी. या बाबतीत (क) ने आंगठी प्रथम ज्यावेळी हलवली त्यावेळी त्याने चोरी केली असे होते.
झ) (क) या (य) ह्या जवाहिऱ्याकडे आपले घड्याळ नियमित करण्यासाठी देतो. (य) ते आपल्या दुकानात नेतो. ज्याबद्दल जवाहिऱ्याला तारण म्हणून ते घड्याळ कायदेशीरपणे ठेवून घेता येईल अशाप्रकारे कोणतेही ऋृण (क) कडून देय नसून तो दुकानात उघडपणे शिरतो व (य) च्या हातातून घड्याळ हिसकावून घेऊन निघून जातो. याबाबतीत, (क) ने फौजदारीपात्र अतिक्रमण व हमला केलेला असला तरी त्याने चोरी केली असे होत नाही, कारण त्याने जे काही केले ते अप्रामाणिकपणाने केलेले नाही.
ञ) घड्याळाची दुरुस्ती केल्याबद्दल (क) हा (य) चे काही पैसे देणे लागत असून (य) ने त्या ऋृणाबद्दल तारण म्हणून कायदेशीरपणे घड्याळ ठेऊन घेतले व आपल्या ऋृणाबद्दलचे तारण म्हणून असलेली मालमत्ता (य) कडून काढून घेण्याच्या उद्देशाने (क) ने ते घड्याळ घेतले तर, (क) ने चोरी केली असे होते, कारण ते त्याने अप्रामाणिकपणे घेतले आहे.
ट) तसेच (क) ने आपले घड्याळ (य) कडे हडप म्हणून ठेवलेले असताना, त्या घड्याळ्यावर त्याने जे पैसे उसने घेतलेले होते ते चुकते न करता, जर त्याने (य) च्या संमतीवाचून ते घड्याळ त्याच्या कब्जातून काढून घेतले तर, ते घड्याळ ही (क) ची स्वत:ची मालमत्ता असली तरी, त्याने घड्याळाची चोरी केली आहे, कारण ते त्याने अप्रामाणिकपणाने घेतले आहे.
ठ) (क) हा (य) ची वस्तू (य) या कब्जातून त्याच्या संमतीवाचून घेतो, ती परत करण्याबद्दल बक्षीस म्हणून (य) कडून पैसे मिळेपर्यंत ती ठेवून घेण्याचा त्याचा उद्देश आहे. याबाबतीत, (क) ती वस्तू अप्रामाणिकपणाने घेतो, त्याअर्थी (क) ने चोरी केली आहे.
ड) (क) चे (य) शी मैत्रीचे संबंध असल्याने (क) हा (य) च्या अनुपस्थितीत (य) च्या ग्रंथालयात जातो आणि एक पुस्तक नुसते वाचून परत करण्याच्या उद्देशाने (क) हा (य) ने स्पष्टपणे संमती दिलेली नसताना ते पुस्तक नेतो. याबाबतीत (य) चे पुस्तक वापरण्याकरिता (य) ची उपलक्षित संमती आहे अशी (क) ने कल्पना केलेली असावी अशी शक्यता आहे. (क) ची अशी समजूत झालेली असेल तर (क) ने चोरी केली असे होत नाही.
ढ) (क) हा (य) च्या पत्नीकडे भिक्षा मागतो. ती (क) ला पैसे, अन्न, वस्त्र देते. ते तिचा पती (य) याचे आहे हे (क) ला माहीत आहे. याबाबतीत, (य) च्या पत्नीला भिक्षा देण्याची मुखत्यारी आहे अशी (क) ने कल्पना केलेली असावी अशी शक्यता आहे. (क) ची अशी समजूत असल्यास त्याने चोरी केली असे होत नाही.
ण) (क) हा (य) च्या पत्नीचा यार आहे. जी मौल्यवान मालमत्ता तिचा पती (य) याची असल्याचे आणि जी देण्याची मुखत्यारी तिला (य) कडून मिळालेली नसल्याचे (क) ला माहीत आहे अशी मालमत्ता ती (क) ला देते. (क) ने ती मालमत्ता अप्रामाणिकपणाने घेतल्यास, तो चोरी करतो असे होते.
त) (य) ची मालमत्ता ही स्वत:ची मालमत्ता असल्याचे सद्भावपूर्वक समजून (क) ती (ख) च्या कब्जातून घेतो. या बाबतीत (क) ने ती मालमत्ता अप्रामाणिकपणाने घेतली नसल्याने तो चोरी करता असे होत नाही.