भारतीय दंड संहिता १८६०
कलम २२२ :
शिक्षादेशाधीन असलेल्या किंवा कायदेशीरपणे हवालतीत पाठवलेल्या व्यक्तीला गिरफदार (अटक) करण्यास बद्ध (बांधलेला) असलेल्या लोकसेवकाने गिरफदारी (अटक) करण्याचे उद्देशपूर्वक टाळणे :
(See section 260 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : न्यायालयाच्या शिक्षादेशास अधीन असलेल्या व्यक्तीला गिरफदार करण्यास विधित: बद्ध असलेल्या लोकसेवकाने गिरफदारी करण्याचे उद्देशपूर्वक टाळणे मृत्यूची शिक्षा झाली असल्यास.
शिक्षा :आजीवन कारावास किंवा १४ वर्षाचा कारावास द्रव्यदंडासह किंवा त्याविना .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——–
अपराध : आजीवन कारावासाची अथवा १० वर्षे किंवा त्याहून अधिक कारावासाची शिक्षा झाली असल्यास.
शिक्षा :७ वर्षाचा कारावास, द्रव्यदंडासह किंवा त्याविना .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——–
अपराध : १० वर्षाहून कमी कारावासाची शिक्षा झाली असल्यास किंवा कायदेशीरपणे हवालतीत पाठवलेले असल्यास.
शिक्षा :३ वर्षाचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जो कोणी लोकसेवक असून, एखाद्या अपराधाबद्दल न्यायालयाची शिक्षादेशास अधीन असलेल्या१.(किंवा कायदेशीरपणे हवालतीत पाठविलेल्या) एखाद्या व्यक्तीला गिरफदार (अटक) करण्यास किंवा बंदिवासात ठेवण्यास विधित: (कायद्याने) बद्ध (बांधील) असताना, अशा व्यक्तीला अटक करण्याचे उद्देशपूर्वक टाळील, अगर उद्देशपूर्वक अशा व्यक्तीला पळून जाऊ देईल, अगर उद्देशपूर्वक अशा व्यक्तीला बंदिवासातून पळून जाण्याच्या किंवा पळून जाण्याच्या प्रयत्न करण्याच्या कामी मदत करील त्याला पुढीलप्रमामे शिक्षा होईल, म्हणजे :
जर बंदिवासातील व्यक्ती किंवा जिला गिरफदार करावयास हवे होते अशी व्यक्ती मृत्यूच्या शिक्षादेशास अधीन असेल, तर त्या लोकसेवकाला, २.(आजन्म कारावासाची) किंवा चौदा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा द्रव्यदंडासहित किंवा त्याविना, होईल; किंवा
जर बंदिवासात असलेली व्यक्ती किंवा जिला गिरफदार (अटक) करावयास हवे होते अशी व्यक्ती न्यायालयाच्या शिक्षादेशानुसार किंवा अशा शिक्षेच्या परिवर्तनामुळे २.(आजन्म कारावासास) ३.(***) ४.(***) ५.(***) ६.(***) किंवा दहा वर्षे अगर त्याहून अधिक मुदतीच्या कारावासास पात्र असेल किंवा त्या लोकसेवकाला सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, द्रव्यदंडासहित किंवा त्याविना होईल; किंवा
जर बंदिवासात असलली व्यक्ती किंवा जिला गिरफदार (अटक) करावयास हवे होते अशी व्यक्ती न्यायालयाच्या शिक्षादेशानुसार दहा वर्षेपर्यंत नसलेल्या इतक्या मुदतीच्या कारावासास अधीन असेल १.(किंवा त्या व्यक्तीला कायदेशीरपणे हवालतीत पाठवण्यात आले असेल) तर, त्या लोकसेवकाला तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
——-
१. १८७० चा अधिनियम २७ – कलम ८ द्वारे समाविष्ट करण्यात आले.
२. १९५६ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप / काळे पाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. १९४९ चा अधिनियम १७ – कलम २ द्वारे किंवा आजीव सक्तमजुरीस हे शब्द वगळण्यात आले.
४. १९५७ चा अधिनियम ३६ – कलम ३ व अनुसूची २ यांद्वारे अथवा हा शब्द गाळला.
५. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे काळ्या पाण्यास हा मजकूर गाळला.
६. १९४९ चा अधिनियम १७ – कलम २ द्वारे किंवा सक्तमजुरीस हे शब्द गाळले.