भारतीय दंड संहिता १८६०
कलम २०६ :
समपऱ्हत (जप्ती) म्हणून किंवा हुकूमनाम्याची अंमलबजावणी म्हणून मालमत्तेचे अभिग्रहण (जप्ती) होऊ नये म्हणून ती मालमत्ता कपटीपणाने हलविणे किंवा लपविणे :
(See section 243 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : समपऱ्हत म्हणून किंवा शिक्षाददेशाखालील द्रव्यदंडाची पूर्ती म्हणून किंवा हुकूमनाम्याची अंमलबजावणी म्हणून मालमत्तेचे अभिग्रहण होऊ नये यासाठी ती कपटपणाने हलवणे किंवा लपवणे.
शिक्षा :२ वर्षांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
———
जर कोणी कपटीपणाने एखादी मालमत्ता हलविली, लपविली अगर ती किंवा तिच्यातील हितसंबंध यांचे हस्तांतरण केले किंवा सुपूर्दगी (स्वाधीन) केली आणि त्यायोगे ती मालमत्ता किंवा तिच्यातील हितसंबंध न्यायालय किंवा अन्य सक्षम प्राधिकारी यांच्याकडून जो अधिघोषित करण्यात आला आहे किंवा अधिघोषित होणे संभवनीय असल्याची स्वत:ला जाणीव आहे अशा एखाद्या न्यायनिर्णयाप्रमाणे समपऱ्हत (जप्त) म्हणून किंवा द्रव्यदंडाची पूर्ती करण्यासाठी घेतले जाऊ नये अथवा एखाद्या दिवाणी दाव्यात एखाद्या न्यायालयाकडून जो काढण्यात आला आहे किंवा काढला जाणे संभवनीय असल्याची स्वत:ला जाणीव आहे अशा हुकूमनाम्याच्या किंवा आदेशाच्या अंमलबजावणीत घेतले जाऊ नये असा त्याचा उद्देश असेल तर, त्याला दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.