भारतीय दंड संहिता १८६०
कलम १९५ :
आजन्म कारावासाची किंवा कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाबद्दल दोषसिद्धी (शिक्षा) घडवून आणण्याच्या उद्देशाने खोटा पुरावा देणे किंवा रचणे :
(See section 231 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : आजीवन कारावासाच्या अथवा ७ वर्षे किंवा त्याहून अधिक कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाबद्दल दोषसिद्धी घडवून आणण्याच्या उद्देशाने खोटा पुरावा देणे किंवा रचणे.
शिक्षा :अपराधाकरिता असेल तीच
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र .
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
———
जर कोणी खोटा पुरावा दिला अगर रचला आणि त्यायोगे १.(२.(भारतात) त्या त्या काळी अमलात असलेल्या कायद्यानुसार) जो अपराध देहांतदंड्य (फाशीच्या) शिक्षेचा नाही, पण ३.(आजीवन कारावासाच्या) किंवा सात वर्षे अगर त्याहून अधिक मुदतीच्या कारवासाच्या शिक्षेस पात्र आहे अशा अपराधाबद्दल कोणत्याही व्यक्तीला सिद्धदोष (शिक्षा व्हावी) ठरवण्यात यावे असा त्याचा उद्देश असेल किंवा त्यायोगे तशी दोषसिद्धी (शिक्षा) होण्यास आपण कारण होणे संभवनीय असल्याची त्यास जाणीव असेल तर, त्यास त्या अपराधाबद्दल (सिद्धदोष) ठरलेली (शिक्षा झालेली) व्यक्ती जशाप्रकारे शिक्षा होण्यास पात्र होऊ शकेल, तशा प्रकारे शिक्षा होईल.
उदाहरण :
(क) न्यायालयापुढे खोटा पुरावा देतो. उद्देश असा की, त्यायोगे (य) हा दरवड्याबद्दल सिद्धदोष ठरावा. दरवड्याला ३.(आजीवन कारावासाची) किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या सश्रम कारावासाची शिक्षा द्रव्यदंडासहित किंवा त्याविना नेमलेली आहे. म्हणून (क) ३.(आजीवन कारावासाच्या) किंवा कारावासाच्या शिक्षेस द्रव्यदंडासहित किंवा त्याविना पात्र आहे.
———-
१. अनुकूलन आदेश १९४८ द्वारे ब्रिटिश इंडियाच्या किंवा इंग्लंडच्या कायद्यानुसार याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची यांद्वारे राज्ये याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप किंवा काळे पाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.