भारतीय दंड संहिता १८६०
कलम १८८ :
लोकसेवकाने रीतसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा :
(See section 223 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोक सेवकाने कायदशीर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा कायदेशीर नेमलेल्या व्यक्तींना अशा अवज्ञेमुळे अटकाव, त्रास किंवा क्षती पोचल्यास.
शिक्षा :१ महिन्याचा साधा कारावास किंवा २०० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
———
अपराध : मानवी जीविताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला अशा अवज्ञेमुळे धोका पोचल्यास इत्यादी.
शिक्षा :६ महिन्याचा कारावास किंवा १००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
———
एखादा आदेश जारी करण्यास कायदेशीरपणे अधिकार असलेल्या लोकसेवकाने आदेश जारी केलेल्या अशा आदेशाद्वारे, विवक्षित (विशिष्ट) कृती करण्यापासून परावृत्त राहण्याचा अथवा स्वत:च्या कब्जातील किंवा स्वत:च्या व्यवस्थापनाखालील विवक्षित (विशिष्ट) मालमत्तेबद्दल विवक्षित (विशिष्ट) बंदोबस्त करण्याचा आपणांस निदेश (आदेश) मिळाला आहे हे माहीत असून, जो कोणी अशा आदेशाची अवज्ञा करील त्याला –
जर कायदेशीपणे नेमलेल्या एखाद्या व्यक्तीला अशा अवज्ञेमुळे अटकाव, त्रास किंवा क्षती (नुकसान) झाली, अथवा अटकाव, त्रास किंवा क्षती (नुकसान) यांचा धोका उत्पन्न झाला अथवा ते होण्याकडे त्या अवज्ञेचा रोख असेल तर, एक महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या साध्या कारावासाची शिक्षा, किंवा दोनशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील;
आणि जर अशा अवज्ञेमुळे मानवी जीवित, आरोग्य, किंवा सुरक्षितता यांना धोका पोचला किंवा पोचण्याकडे तिचा रोख असेल अथवा तीमुळे दंगा किंवा दंगल घडून आली किंवा घडवून येण्याकडे तिचा रोख असेल तर, सहा महिन्यापर्यंत असे शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा एक हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
स्पष्टीकरण :
अपाय घडवून आणणे अपराध्यास उद्देशित असले पाहिजे, किंवा आपण अवज्ञा केल्याने अपाय घडणे संभवनीय आहे, याची त्याला पूर्वकल्पना असली पाहिजे अशी आवश्यकता नाही. तो ज्याची अवज्ञा करतो त्या आदेशाची त्याला माहिती होती आणि त्याच्या अवज्ञेमुळे अपाय घडला किंवा घडणे संभवनीय आहे इतके पुरेसे आहे.
उदाहरण :
एका विशिष्ट रस्त्यावरुन धार्मिक मिरवणूक जाता कामा नये असा आदेश जारी करण्यास कायदेशीर अधिकार प्रदान झालेल्या लोक सेवकाने असा आदेश जारी केला आहे. (क) जाणीव पूर्वक त्या आदेशाची अवज्ञा करतो, आणि त्यामुळे दंग्याचा धोका उत्पन्न होतो. (क) ने या कलमात व्याख्या करण्यात आलेला अपराध केला आहे.