Ipc कलम १७७ : खोटी माहिती पुरवणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम १७७ :
खोटी माहिती पुरवणे :
(See section 212 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : समजूनसवरुन लोकसेवकाला खोटी माहिती पुरवणे.
शिक्षा : ६ महिन्याचा कारावास किंवा १००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———-
अपराध : जर आवश्यक करण्यात आलेली माहिती अपराध घडणे, इत्यादीसंबंधी असेल तर.
शिक्षा : २ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही .
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———-
लोकसेवक म्हणून एखाद्याला कोणत्याही विषयासंबंधी माहिती पुरविण्यास विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेला) असलेला जो कोणी त्या विषयासंबंधीची जी माहिती खोटी असल्याचे आपणांस माहीत आहे किंवा तसे समजण्यास कारण आहे, अशी माहिती खरी म्हणून पुरवील त्याला, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची शिक्षा, किंवा एक हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडची, किंवा दोन्ही शिक्षा होतील
किंवा, जी माहिती देण्यास तो विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेला) आहे ती अपराध घडण्याविषयी असेल, अथवा अपराधा घडण्यास प्रतिबंध करण्यासाठी अगर अपराध्याला गिरङ्क दार करण्यासाठी आवश्यक असेल तर, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
उदाहरणे :
क) (क) हा जमीनधारक त्याच्या जमिनीच्या हद्दींच्या आत एखाद्याचा खून घडल्याचे माहित असताना, साप चावल्याच्या परिणामी अपघाताने त्याचा मृत्यू झालेला आहे अशी चुकीची माहीती जिल्ह्याच्या दंडाधिकाऱ्याला बुद्धिपुरस्सर देतो. (क) या कलमात व्याख्या केलेल्या अपराधाबद्दल दोषी आहे.
ख) (क) हा गावाचा राखणदार रामोशी असून शेजारच्या गावात राहणारा श्रीमंत व्यापारी (य) याच्या घरामध्ये दरवडा घालण्यासाठी अनोळखी माणसांची एक टोळी जाताना त्याच्या गावामधून गेलेली आहे हे माहीत असताना आणि सर्वात नजीकच्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याकडे वरील गोष्टींची माहिती त्वरित व वेळच्या वेळी देण्यात तो बंगाल विधि संहिता १.(विनिमय) ३ रा, १८२१ – कलम ७ वे खंड ५ याअन्वये बद्द असताना पोलीस अधिकाऱ्याला बद्धिपुरस्सर अशी चुकीची माहिती देतो की, वेगळ्याच दिशेला असलेल्या एका विवक्षित दूरच्या ठिकाणी दरवडा घालण्यासाठी संशयास्पद इसमांची एक टोळी गावामधून गेलेली आहे. या बाबतीत (क) या कलमाच्या उत्तर भागामध्ये व्याख्या करण्यात आलेल्या अपराधाबद्दल दोषी आहे.
२.(स्पष्टीकरण:
कलम १७६ मध्ये आणि या कलमामध्ये अपराध या शब्दात ३.(भारताबाहेरील) कोणत्याही ठिकाणी करण्यात आलेली जी कृती भारतामध्ये केली असती तर, पुढील म्हणजेच कलम ३०२,३०४,३८२,३९२,३९३,३९४,३९५, ३९६,३९७,३९८,३९९,४०२,४३५,४३६,४४९,४५० , ४५७,४५८,४५९, व ४६० यांंपैकी कोणत्याही कलमाखाली शिक्षापात्र ठरली असती अशा कोणत्याही कृतीचा समावेश आहे आणि अपराधी या शब्दात अशी कोणतीही कृती केल्याबद्दल जो दोषी असल्याचे अभिकथन करण्यात आले आहे अशा कोणत्याही व्यक्तीचा समावेश आहे.)
———-
१. १८६२ चा अधिनियम १७ द्वारे निरसित.
२. १८९४ चा अधिनियम ३ – कलम ५ द्वारे जादा दाखल केले.
३. अनुकूल आदेश १९४८, अनुकूलन आदेश १९५० आणि १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची यांद्वारे ब्रिटिश इंडिया याऐवजी समाविष्ट केले.

Leave a Reply