भारतीय दंड संहिता १८६०
कलम १७६ :
लोकसेवकाला दखल किंवा माहिती देण्यास विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेला) असलेल्या व्यक्तीने ती देण्याचे टाळणे :
(See section 211 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवकाला दखल किंवा माहिती देण्यास विधित: बद्ध असलेल्या व्यक्तीने अशी दखल किंवा माहिती देण्याचे उद्देशपूर्वक टाळणे.
शिक्षा :१ महिन्याचा साधा कारावास किंवा ५०० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
————
अपराध : जर आवश्यक करण्यात आलेली दखल किंवा माहिती अपराध घडणे, इत्यादी संबंधी असेल तर.
शिक्षा :६ महिन्याचा साधा कारावास किंवा १००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
————-
अपराध : फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३५६ च्या पोटकलम (१) खाली काढलेल्या आदेशाद्वारे दखल किंवा माहिती देणे आवश्यक केले असेल तर.
शिक्षा :६ महिन्याचा कारावास किंवा १००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
————-
लोकसेवक म्हणून एखाद्याला एखाद्या विषयासंबंधी कोणतीही दखल देण्यास अगर माहिती पुरविण्यास विधित: (कायदेशीर) बद्ध (बांधलेला) असून जो कोणी कायद्याद्वारे आवश्यक केलेल्या अशा रीतीने व तशा वेळी अशी दखल देण्याचे अगर माहिती पुरविण्याचे उद्देशपूर्वक टाळील, त्याला एक महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या साध्या कारावासाची शिक्षा, किंवा पाचशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील;
किंवा जी दखल किंवा माहिती देणे आवश्यक आहे ती अपराध घडण्यासंबंधीची असेल, अथवा अपराधा घडण्यास प्रतिबंध करण्यासाठी किंवा अपराध्याला गिरफदार करण्यासाठी आवश्यक असेल, तर सहा महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या साध्या कारावासाची, किंवा एक हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील;
१.(किंवा जी दखल किंवा माहिती देणे आवश्यक आहे, ती फौजदारी प्रक्रिया संहिता १८९८ (१८९८ चा ५) (आता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३) याच्या कलम ५६५ (१)(नवीन कलम ३५६(१)) अन्वये काढण्यात आलेल्या आदेशानुसार आवश्यक असेल तर,सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा एक हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.)
———
१. १९३९ चा अधिनियम २२ – कलम २ द्वारे जादा दाखल केले.