हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६
कलम १४ :
हिंदू स्त्रीची संपत्ती ही तिची अबाधित संपत्ती असणे :
१) हिंदू स्त्री, ज्या संपत्तीवर तिचा कब्जा असेल अशी कोणतीही संपत्ती-मग ती या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी संपादन केलेली असो वा नंतर असो-तिची पूर्ण मालक म्हणून धारण करील, मर्यादित मालक म्हणून नव्हे.
स्पष्टीकरण :
या पोटकलमात, संपत्ती यात हिंदू स्त्रीने वारसाहक्काने किंवा मृत्युपत्रीय दानाद्वारे अथवा वाटणीमध्ये, अथवा पोटगी किंवा पोटगीची थकबाकी यांच्याऐवजी, अथवा कोणत्याही व्यक्तीकडून-मग ती नातलग असो वा नसो-तिच्या विवाहाच्या पूर्वी, वेळी किंवा नंतर दानाद्वारे, अथवा तिच्या स्वत:च्या कौशल्याने किंवा परिश्रमाने, अथवा क्रयाने किंवा चिरभोगाने, अथवा अन्य कोणत्याही रीतीने संपादन केलेल्या स्थावर आणि जंगम अशा दोन्ही प्रकारच्या संपत्तीचा व या अधिनियमाच्या प्रारंभाच्या निकयपूर्वी तिने स्त्रीधन म्हणून धारण केलेल्या अशा कोणत्याही संपत्तीचादेखील समावेश आहे.
२) दानाच्या रुपाने अथवा मृत्युपत्राखाली किंवा अन्य कोणत्याही संलेखाखाली अथवा दिवाणी न्यायालयाचा हुकूमनामा किंवा आदेश याखाली अथवा निवाड्याखाली एखादी संपत्ती प्राप्त झालेली असून, दान, मृत्युपत्र किंवा अन्य संलेख किंवा हुकूमनामा, आदेश किंवा निवाडा यांच्या तरतुदींनुसार अशा संपत्तीत मर्यादित हक्कसंबंध विहित केलेला असेल त्या बाबतीत अशा संपत्तीला पोेटकलम (१) मध्ये अंतर्भूत असलेली कोणतीही गोष्ट लागू असणार नाही.
