हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६
कलम २ :
अधिनियम लागू करणे :
१) हा अधिनियम पुढील व्यक्तींना लागू आहे :-
(a)क) जी व्यक्ती धर्माने, त्याचे कोणतेही रुप किंवा विकसन यांनुसार हिंदू आहे अशी कोणतीही व्यक्ती – वीरशैव, लिंगायत अथवा ब्रम्होसमाजाचा, प्रार्थनासमाजाचा किंवा आर्यसमाजाचा अनुयायी यांसुद्धा.
(b)ख) जी व्यक्ती धर्माने बौद्ध, जैन किंवा शीख आहे अशी कोणतीही व्यक्ती, आणि
(c)ग) जी व्यक्ती धर्माने, मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी किंवा ज्यू नाही अशी अन्य कोणतीही व्यक्ती – मात्र हा अधिनियम पारित झाला नसता तर यात परामर्श घेण्यात आलेल्यांपैकी कोणत्याही बाबींसंबंधी ती हिंदू कायद्याने अथवा त्या कायद्याचा भाग असलेल्या कोणत्याही रुढीने किंवा परिपाठाने नियंत्रित झाली नसती असे सिद्ध करण्यात आले तर गोष्ट अलाहिदा.
स्पष्टीकरण :
पुढील व्यक्ती धर्माने, हिंदू, बौद्ध, जैन किंवा प्रकरणपरत्वे शीख आहेत :-
(a)क) ज्याच्या मातापित्यांपैकी दोघेही धर्माने हिंदू, बौद्ध, जैन किंवा शीख आहेत असे कोणतेही औरस किंवा अनौरस अपत्य;
(b)ख) ज्याच्या मात्यापित्यांपैकी एकजण धर्माने हिंदू, बौद्ध, जैन किंवा शीख आहे आणि अशी माता वा पिता ज्या जनजातीतील, समाजातील, समूहातील किंवा कुलातील आहे किंवा होता त्याचा घटक म्हणून ज्याचे पालनपोषण करण्यात आले आहे असे कोणतेही औरस किंवा अनौरस अपत्य; आणि
(c)ग) जी व्यक्ती हिंदू, बौद्ध, जैन किंवा शीख धर्मात धर्मांतरित किंवा पुर्नधर्मांतरित झाली आहे अशी कोणतीही व्यक्ती.
२) पोटकलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, या अधिनियमात अंतर्भूत असलेली कोणतीही गोष्ट संविधानाचा अनुच्छेद ३६६ याचा खंड (२५) याच्या अर्थानुसार कोणत्याही अनुसूचित जनजातीच्या घटकव्यक्तींना लागू असणार नाही – मात्र केंद्र शासनाने राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अन्यथा निदेशित केले तर गोष्ट अलाहिदा.
३) या अधिनियमाच्या कोणत्याही भागातील हिंदू या शब्दप्रयोगात, जी व्यक्ती धर्माने हिंदू नसली तरी या कलमात अंतर्भूत असलेल्या उपबंधांच्या आधारे जिल हा अधिनियम लागू होतो अशी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा जणू काही समावेश होता, अशा तऱ्हेने या शब्दप्रयोगाचा अर्थ लावला जाईल.