Hsa act 1956 कलम १६ : हिंदू स्त्रीच्या वारसदारांमध्ये उत्तराधिकाराचा क्रम व वितरणाची रीत :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६
कलम १६ :
हिंदू स्त्रीच्या वारसदारांमध्ये उत्तराधिकाराचा क्रम व वितरणाची रीत :
कलम १५ मध्ये निर्दिष्ट केलेल्या वारसदारांमधील उत्तराधिकारचा क्रम पुढील नियमांनुसार असेल व त्यांनुसार त्या वारसदारांमध्ये अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या संपत्तीचे वितरण होईल, ते असे :-
नियम १ :
कलम १५ च्या पोटकलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या वारसदारांमध्ये एका नोंदीत समाविष्ट असलेल्या वारसदारांना कोणत्याही उत्तरवर्ती नोंदीत सामविष्ट असलेल्यांपेक्षा अधिमान दिला जाईल व एकाच नोंदीत सामविष्ट असलेल्या वारसदारांना एकसमयावच्छेदेकरुन ती संपत्ती मिळेल.
नियम २ :
जर अकृतमृत्युपत्र व्यक्तीचा कोणताही पुत्र किंवां कन्या अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या आधी मृत्यु पावला किंवा पावली असून, त्यांच्या मागे त्याची किंवा तिची स्वत:ची अपत्ये अकृतमृत्युपत्र, व्यक्तीच्या मृत्युसमयी हयात असतील तर, अशा पुत्राची किंवा कन्येची अपत्ये यांना आपसात मिळून असा पुत्र किंवा कन्या अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या मृत्युसमयी हयात असता किंवा असती तर त्याला जो मिळाला असता तो हिस्सा मिळेल.
नियम ३ :
अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या संपत्तीची कलम १५ चे पोटकलम (१) याच्या खंड (ख), (घ) व (ङ) मध्ये व पोटकलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेल्या वारसदारांकडे होणारी प्रक्रांती, जर ती संपत्ती, प्रकरणपरत्वे, पित्याची किंवा मातेची किंवा पतीची असती आणि अशी व्यक्ती अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या मृत्यूच्या लगतनंतर ती संबंधात मृत्युपत्र न करता मरण पावली असती तर, जो क्रम व जे नियम लागू झाले असते त्यांच्याच अनुसार होईल.

Leave a Reply