Hma 1955 कलम ८ : हिंदू विवाहाची नोंदणी :

हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम ८ :
हिंदू विवाहाची नोंदणी :
१) हिंदू विवाहाची शाबिती सुकर करण्यासाठी, अशा कोेणत्याही विवाहातील पक्षांना आपल्या विवाहासंबंधीच्या तपशिलाची नोेंद त्या प्रयोजनार्थ ठेवलेल्या हिंदू विवाह नोंदपुस्तकात विहित करण्यात येईल अशा रीतीने व अशा शर्तीच्या अधीनतेने करुन घेता यावी यासाठी उपबंध करणारे नियम राज्य शासनाला करता येतील.
२) पोटकलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, जर तसे आवश्यक किंवा समयोचित आहे असे राज्य शासनाचे मत असेल तर, पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे तपशिलाची नोेंद करणे त्या राज्यात किंवा त्याच्या कोणत्याही भागात – मग ते सर्व बाबतीत असा वा विनिर्दिष्ट केल्या जातील अशा बाबतीत असो – सक्तीचे राहील असे त्याला उपबंधित करता येईल आणि असा कोणताही निदेश दिलेला असेल तेव्हा, याबाबत केलेल्या कोणत्याही नियमाचे व्यतिक्रमण करणारी कोणतीही व्यक्ती पंचवीस रुपयांपर्यत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास पात्र होईल.
३) या कलमाखाली केलेले सर्व नियम, ते केल्यानंतर होईल तितक्या लवकर, राज्य विधान मंडळासमोर ठेवले जातील.
४) हिंदू विवाह नोंदपुस्तक सर्व वाजवी वेळी निरीक्षणार्थ खुले राहील, व त्यात अंतर्भूत असलेल्या निवेदनांचा पुरावा म्हणून ते ग्राह्य असेल आणि अर्ज करुन निबंधकाकडे विहित फी भरल्यानंतर त्याच्याकडून त्यातील प्रमाणित उतारे दिले जातील.
५) या कलमात काहीही अंतर्भूत असले तरी, कोणत्याही हिंदू विवाहाची नोंद् करण्यास चुकल्यामुळे त्या विवाहाच्या विधिग्राह्यतेवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही.

Leave a Reply