Hma 1955 कलम ३ : व्याख्या :

हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम ३ :
व्याख्या :
या अधिनियमात, संदर्भामुळे अन्यथा आवश्यक नसेल तर, –
(a)क) रुढी व परिपाठ या शब्दप्रयोगांद्वारे जो नियम सातत्याने व एकाच स्वरुपात दीर्घकाळ पाळला जात असून ज्याला हिंदूमध्ये कोणत्याही स्थानिक क्षेत्रात, जनजातीत, समाजात, समुहात किंवा कुलात कायद्याने बळ प्राप्त झालेले आहे असा कोणताही नियम दर्शविला जातो :
परंतु, तो नियम निश्चित असावा आणि गैरवाजवी किंवा लोकधोरणाच्या विरुद्ध नसावा :
परंतु आणखी असे की, फक्त कुलालाच लागू असलेल्या नियमाच्या बाबतीत, त्या कुलाने तो सोडून दिलेला नसावा;
(b)ख) जिल्हा न्यायालय याचा अर्थ, ज्याच्यासाठी नगर दिवाणी न्यायालय असेल अशा कोणत्याही क्षेत्रात ते न्यायालय, व अन्य कोणत्याही क्षेत्रात अव्वल अधिकारितेचे प्रधान दिवाणी न्यायालय असा आहे, आणि जे दिवाणी न्यायालय या अधिनियमात परामर्श घेण्यात आलेल्या बाबींसंबंधात अधिकारिता असलेले न्यायालय म्हणून राज्य शासनाकडून शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट केले जाईल अशा अन्य कोणत्याही दिवाणी न्यायालयाचा त्यात समावेश आहे;
(c)ग) सख्खे नाते आणि सापत्न नाते – जेव्हा दोन व्यक्तींचा समान पूर्वजपुरुषांपासून त्याच्या एकाच पत्नीच्या द्वारे वंशोद्भव झालेला असतो तेव्हा, त्या एकमेकाशी सख्या नात्याने आणि जेव्हा त्यांचा समान पूर्वजपुरुषापासून पण त्यांच्या निरनिराळ्या पत्नींच्या द्वारे वंशोद्भव झालेला असतो तेव्हा, त्या व्यक्ती एकमेकाशी सापत्न नात्याने संबंधित आहेत असे म्हणतात;
(d)घ) सहोदर नाते – जेव्हा दोन व्यक्तींचा समान पूर्वजस्त्रीपासून पण तिच्या निरनिराळ्या पतींच्या द्वारे वंशोद्भव झालेला असतो तेव्हा, त्या व्यक्ती एकमेकीशी सहोदर नात्याने संबंधित आहेत असे म्हणतात;
स्पष्टीकरण :
खंड (ग) व (घ) यांमध्ये, पूर्वजपुरुष यात पित्याचा व पूर्वजस्त्री यात मातेचा समावेश आहे;
(e)ङ) विहित याचा अर्थ, या अधिनियमाखाली केलेल्या नियमांद्वारे विहित केलेले असा आहे;
(f)च) (एक) कोणत्याही व्यक्तीच्या संदर्भात सपिंड नातेसंबंधाची व्याप्ती मातेकडून आरोही वंशक्रमाने तिसऱ्या पिढीपर्यंत (ती धरुन), आणि पित्याकडून आरोही वंशक्रमाने पाचव्या पिढीपर्यंत (ती धरुन) आहे – प्रत्येक बाबतीत संबंधित व्यक्ती ही पहिली पिढी म्हणून तिची गणना करुन तिच्यापासून वंशक्रमाचा वरच्या दिशेने मागोवा घ्यावा;
दोन) जर दोन व्यक्तींपैकी सपिंड नातेसंबंधाच्या मर्यादेत एक व्यक्ती दुसरीची रेषीय पूर्वज असेल, किंवा जर त्यांच्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भात जो सपिंड नातेसंबंधाच्या मर्यादेत आहे असा त्याचा समान रेषीय पूर्वज असेल तर, त्या व्यक्ती एकमेकींच्या सपिंड आहेत असे म्हणतात;
(g)छ) निषिद्ध नातेसंबंधाच्या श्रेणी – दोन व्यक्तींपैकी, –
एक) व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची रेषीय पूर्वज असेल तर, किंवा
दोन) एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या रेषीय पूर्वजाची किंवा वंशजाची पत्नी किंवा पती होती असे असेल तर; किंवा
तीन) एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या भावाची अथवा पित्याच्या किंवा मातेच्या भावाची अथवा आज्याच्या किंवा आजीच्या भावाची पत्नी होती असे असेल तर; किंवा
चार) जर दोघे बहीण-भाऊ / चुलता-पुतणी / मामा-भाची, आत्या-भाचा / मावशी – भाचा, चुलती -पुतण्या, अथवा भावाची व बहिणीची किंवा दोन भावांची किंवा दोन बहिणींची अपत्ये असतील तर,
त्या व्यक्ती निषिद्ध नातेसंबंधाच्या श्रेणीच्या अंतर्गत आहेत असे म्हणतात;
स्पष्टीकरण : खंड (च) आणि (छ) यांच्या प्रयोजनार्थ, नातेसंबंध यात –
एक) सापत्न किंवा सहोदर नात्याचा व तसेच सख्या नात्याचा संबंध ;
दोन) अनौरस तसेच औरस रक्तसंबंध;
तीन) दत्तकाचा तसेच रक्ताचा नातेसंबंध;
यांचा समावेश आहे आणि त्या खंडातील नातेसंबंधविषयक सर्व संज्ञांचा अर्थ तदनुसार लावला जाईल.

Leave a Reply