हिंदू विवाह अधिनियम १९५५
व्यावृत्ती व निरसने :
कलम २९ :
व्यावृत्ती :
१) या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी हिंदूमध्ये विधिपूर्वक लावलेला जो विवाह अन्यथा विधिग्राह्य आहे तो, त्यातील पक्ष एकाच गोत्राचे किंवा प्रवराचे होते अथवा भिन्न धर्माचे, जातीचे किंवा एकाच जातीच्या भिन्न पोटशाखांचे होते एवढ्याच वस्तुस्थितीच्या कारणास्तव विधिबाह्य आहे किंवा कधीकाळी विधिबाह्य होता असे मानले जाणार नाही.
२) हिंदू विवाहाचा – मग तो या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी लावलेला असो वा नंतर लावलेला असो – विच्छेद मिळविण्याचा जो कोणताही हक्क रुढीने मान्य केलेला किंवा कोणत्याही विशेष अधिनियमितीने प्रदान केलेला असेल त्यावर या अधिनियमात अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे परिणाम होतो असे मानले जाणार नाही.
३) कोणताही शून्य विवाह व रद्दबातल म्हणून घोषित केला जाण्यासाठी अथवा कोणताही विवाह शून्य करण्यासाठी किंवा त्याचा विच्छेद करण्यासाठी अथवा न्यायिक फारकतीसाठी त्या त्या काळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याखाली केलेली जी कार्यवाही या अधिनियमाच्या प्रारंभी प्रलंबित असेल अशा कोणत्याही कार्यवाहीवर या अधिनियमात अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे परिणाम होणार नाही, आणि अशी कोणतीही कार्यवाही जणू काही हा अधिनियम पारित झाला नसावा अशा प्रकारे चालू ठेवून तिचा निकाल करता येईल.
४) विशेष विवाह अधिनियम १९५४ (१९५४ चा ४३) यामध्ये त्या अधिनियमाखाली हिंदूमध्ये विधिपूर्वक लावल्या जाणाऱ्या विवाहासंबंधी – मग ते या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी लावलेले असोत वा नंतर लावलेले असोत – अंतर्भूत असलेल्या उपबंधांवर या अधिनियमात अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे परिणाम होतो असे मानले जाणार नाही.