हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम २५ :
स्थायी पोटगी व निर्वाह खर्च :
१) या अधिनियमाखाली अधिकारिता वापरणारे कोणतेही न्यायालय, कोणताही हुकूमनामा करण्याच्या वेळी किंवा त्यानंतर कोणत्याही वेळी; प्रकरणपरत्वे, पत्नी किंवा पती यांपैकी कोणीही त्या प्रयोजनासाठी त्यांच्याकडे अर्ज केल्यावर उत्तरवादीचे जर काही स्वत:चे उत्पन्न व अन्य संपत्ती असेल तर ती, अर्जदाराचे उत्पन्न व अन्य संपत्ती, १.(पक्षांचे वर्तन आणि प्रकरणातील अन्य परिस्थिती) लक्षात घेता, न्यायालयास न्याय्य वाटेल अशी ठोक रक्कम अथवा अशी मासिक किंवा नियतकालिक रक्कम अर्जदाराच्या हयातीहून अधिक नाही इतक्या मुदतीकरता अर्जदाराला उत्तरवादीने २.(***) त्याच्या किंवा तिच्या निर्वाहासाठक्ष व पोषणासाठी दिली पाहिजे असा आदेश देऊ शकेल, आणि अशी रक्कम, जरुर तर, उत्तरवादीच्या स्थावर संपत्तीवर प्रभार निर्माण करुन त्याद्वारे प्रतिभूत करता येईल.
२) जर पोटकलम (१) खाली न्यायालयाने आदेश केल्यानंतर कोणत्याही वेळी कोणत्याही पक्षाच्या परिस्थितीत बदल झाला आहे अशी न्यायालयाची खात्री झाली तर, त्याला कोणत्याही पक्षाच्या सांगण्यावरुन आपणास न्याय्य वाटेल अशा रीतीने अशा कोणत्याही आदेशात फरक किंवा सुधारणा करता येईल अथवा तो विखंडित करता येईल.
३) या कलमाखाली ज्याच्या बाजूने आदेश करण्यात आलेला आहे त्या पक्षाने पुन्हा विवाह केला आहे किंवा असा पक्ष पत्नी असल्यास ती शीलवती राहिलेली नाही किंवा असा पक्ष पती असल्यास त्याने कोणत्याही स्त्रीशी विवाहबाह्य संभोग केला आहे अशी जर न्यायालयाची खात्री झाली तर, १.(त्याला, दुसऱ्या पक्षाच्या सांगण्यावरुन स्वत:स न्याय्य वाटेल अशा रीतीने अशा कोणत्याही आदेशात फरक किंवा सुधारणा करता येईल अथवा तो विखंडित करता येईल.)
——-
१. १९७६ चा अधिनियम ६८ कलम १८ द्वारे विवक्षित शब्दांऐवजी घातले.
२. १९७६ चा अधिनियम ६८ कलम १८ द्वारे अर्जदार अविवाहित असेतोवर हे शब्द गाळले.