Fssai कलम ४१ : शोध, जप्ती, अन्वेषण (तपास), खटला चालविण्याचे अधिकार आणि त्यांची प्रक्रिया :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ४१ :
शोध, जप्ती, अन्वेषण (तपास), खटला चालविण्याचे अधिकार आणि त्यांची प्रक्रिया :
१) कलम ३१ च्या पोटकलम (२) मध्ये काहीही असले तरी, अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्यास अन्नाशी (खाद्याशी) संबंधित कोणताही अपराध घडला आहे याचा वाजवी संशय असल्यास, कोणत्याही ठिकाणाची झडती घेऊ शकेल, कोणताही अन्न (खाद्य) पदार्थ किंवा भेसळीचा पदार्थ आढळल्यास जप्त करु शकेल आणि त्यानंतर त्याने केलेल्या कार्यवाहीची सूचना लिखित स्वरुपात निर्देशित अधिकाऱ्यास देईल :
परंतु असे की, कोणताही शोध किंवा झडती त्या शोधाकरिता बोलावलेले साक्षीदार त्या परिसरातील नाहीत ज्या ठिकाणाची झडती घेतली आहे या कारणावरुन अनियमित ठरणार नाही.
२) या अधिनियमात स्पष्टपणे तरतुद केली असेल त्या व्यतिरिक्त अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याने या अधिनियमान्वये केलेल्या सर्व कृतींना, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३) याच्या शोध (झडती), जप्ती, समन्स, अन्वेषण (तपास) व खटला या संबंधातील तरतुदी शक्य तेथवर लागू होतील.

Leave a Reply