पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६
कलम २ :
व्याख्या :
या अधिनियमात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, –
(a) (क) पर्यावरण या संज्ञेमध्ये पाणी, हवा व जमीन आणि मनुष्यप्राणी, इतर जीवसृष्टी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि संपत्ती यांच्यामध्ये आपापसात आणि या दोहोंमध्ये परस्पर असलेला संबंध, यांचा समावेश होतो;
(b) (ख) पर्यावरणी प्रदूषक याचा अर्थ, पर्यावरणास अपायकारक असेल किंवा तसा ठरू शकेल अशा संहतीत विद्यमान असलेला कोणताही घनरूप, द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थ असा आहे;
(c) (ग) पर्यावरणी प्रदूषण याचा अर्थ, पर्यावरणात कोणत्याही पर्यावरण प्रदूषकाचे अस्तित्व असणे, असा आहे.
(d) (घ) कोणत्याही पदार्थांच्या संबंधात, हाताळणे याचा अर्थ, अशा पदार्थांची निर्मिती करणे, त्यावर प्रक्रिया करणे, त्याचे संस्करण करणे, त्याची पुडकी बांधणे, साठा करणे, परिवहन करणे, वापर करणे, तो गोळा करणे, त्याचा नाश करणे, त्याचे रूपांतर करणे, तो विक्रीकरिता, हस्तांतरणाकरिता किंवा तत्सम कामाकरिता देऊ करणे, असा आहे;
(e) (ड) जोखमीचा पदार्थ याचा अर्थ, आपल्या रासायनिक किंवा भौतिक-रासायनिक गुणधर्मामुळे किंवा हाताळण्यामुळे माणसांना, इतर जीवनसृृष्टीस, वनस्पतींना, सूक्ष्मजीवांना, संपत्तीला किंवा पर्यावरणाला अपाय करू शकतो असा कोणताही पदार्थ किंवा सिद्ध पदार्थ, असा आहे;
(f) (च) भोगवटादार याचा अर्थ, कोणत्याही कारखान्याच्या किंवा जागेच्या संबंधातील त्या कारखान्याच्या किंवा जागेच्या कारभारावर ज्या व्यक्तीचे नियंत्रण आहे ती व्यक्ती, असा आहे आणि त्यामध्ये, कोणत्याही पदार्थांच्या संबंधात, तो पदार्थ कब्जात असणाऱ्या व्यक्तीचा समावेश होतो;
(g) (छ) विहित याचा अर्थ, या अधिनियमान्वये केलेल्या नियमांद्वारे विहित केलेले, असा आहे.