पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६
कलम २५ :
नियम करण्याची शक्ती :
(१) केंद्र सरकार या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्याकरिता, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करू शकेल.
(२) विशेषत: आणि पूर्वगामी शक्तीच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता, अशा नियमांद्वारे पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबींकरिता उपबंध करता येतील, त्या बाबी अशा :
(a) (क) कलम ७ अन्वये, ज्या मानकांपेक्षा अधिक प्रमाणात प्रदूषके विसर्जित किंवा उत्सर्जित केली जाता कामा नये, ती मानके;
(b) (ख) ज्या कार्यपद्धतीनुसार आणि ज्या संरक्षक तरतुदींचे अनुपालन करून, कलम ८ अन्वये, जोखमीचे पदार्थ हाताळले जातील किंवा हाताळले जाण्याची व्यवस्था करता येईल ती कार्यपद्धती व त्या संरक्षक तरतुदी;
(c) (ग) कोणत्याही पर्यावरणी प्रदूषकाचे, विहित मानकांपेक्षा अधिक प्रमाणात उत्सर्जन होत आहे किंवा होत असल्याची आशंका आहे या वस्तुस्थितीची सूचना ज्यांना देण्यात आली पाहिजे तसेच कलम ९ च्या पोटकलम (१) अन्वये ज्याच्यावर सर्व साहाय्य देण्याची बांधिलकी आहे अशी प्राधिकरणे किंवा अभिकरणे;
(d) (घ) कलम ११ च्या पोटकलम (१) अन्वये हवा, पाणी, माती किंवा इतर पदार्थ यांचे नमुने विश्लेषणाकरिता ज्या रीतीने घेता येतील ती रीत;
(e) (ङ) कलम ११ च्या पोटकलम (३) च्या खंड (क) अन्वये नमुन्यांचे विश्लेषण करवून घेण्याच्या हेतूची नोटीस ज्या नमुन्यात बजावण्यात येईल तो नमुना;
(f) (च) पर्यावरणी प्रयोगशाळेची कार्ये हवा, पाणी, माती आणि इतर पदार्थ यांचे नमुने विश्लेषणाकरिता किंवा चाचणीकरिता अशा प्रयोगशाळेकडे सादर करण्याची कार्यपद्धती; प्रयोगशाळेच्या अहवालाचा नमुना; अशा अहवालाकरिता द्यावयाची फी आणि अशा प्रयोगशाळेला तिची कलम १२ च्या पोटकलम (२) खालील कामे पार पाडणे शक्य व्हावे यासंबंधीच्या इतर बाबी;
(g) (छ) हवा, पाणी, माती किंवा इतर पदार्थांच्य नमुन्यांचे विश्लेषण करण्याच्या प्रयोजनाकरिता कलम १३ अन्वये नियुक्त करण्यात किंवा मान्यता देण्यात आलेल्या शासकीय विश्लेषकाच्या अर्हता;
(h) (ज) कलम १९ च्या खंड (ख) अन्वये, अपराधाची नोटीस, आणि केंद्र सरकारकडे तक्रार करण्याच्या उद्देशाची नोटीस ज्या रीतीने देण्यात येईल ती रीत;
(i) (झ) कलम २० अन्वये कोणतेही अहवाल, विवरणे, आकडेवारी, लेखे आणि अन्य माहिती ज्यास पुरविण्यात येईल असे प्राधिकरण किवा अधिकारी;
(j) (त्र) जी विहित करणे आवश्यक आहे किंवा करता येईल अशी अन्य कोणतीही बाब.