पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६
कलम १६ :
कंपन्यांनी केलेले अपराध :
(१) या अधिनियमाखालील अपराध एखाद्या कंपनीने केला असेल तर, अपराध घडला त्यावेळी जी जी व्यक्ती कंपनीच्या कामकाजचालनाबद्दल तिची प्रत्यक्ष प्रभारी होती आणि तिला जबाबदार होती अशी प्रत्येक व्यक्ती, त्याचप्रमाणे कंपनीही त्या अपराधाबद्दल दोषी असल्याचे मानण्यात येईल आणि तिच्याविरूद्ध कार्यवाही केली जाण्यास आणि त्यानुसार शिक्षा दिली जाण्यास ती पात्र असेल :
परंतु, जर अशा कोणत्याही व्यक्तीने, अपराध आपल्या नकळत घडला किंवा असा अपराध घडू नये यासाठी आपण शक्य तेवढी वाजवी तत्परता दाखविली होती असे शाबीत केले तर या पोटकलमात अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे अशी कोणतीही व्यक्ती या अधिनियमात उपबंधित केलेल्या कोणत्याही शिक्षेस पात्र ठरणार नाही.
(२) पोटकलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, जर या अधिनियमाखालील अपराध एखाद्या कंपनीने केला असेल आणि कंपनीचा कोणताही संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा अन्य अधिकारी यांच्या संमतीने किंवा मुकानुमतीने अपराध करण्यात आला होता किंवा त्याने केलेल्या हलगर्जीपणाशी त्याचा कारणसंबंध जोडता येण्यासारखा आहे, असे शाबीत करण्यात आले तर, असा संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा अन्य अधिकारीही त्या अपराधाबद्दल दोषी असल्याचे मानण्यात येईल आणि त्याच्याविरूद्ध कार्यवाही केली जाण्यास आणि त्यानुसार शिक्षा दिली जाण्यास तो पात्र असेल.
स्पष्टीकरण : या कलमाच्या प्रयोजनार्थ, –
(a) (क) कंपनी याचा अर्थ, कोणताही निगम निकाय, असा आहे आणि त्यात पेढी किंवा अन्य व्यक्तीसंघ समाविष्ट आहे, आणि
(b) (ख) संचालक याचा पेढीच्या संबंधातील अर्थ, पेढीतील भागीदार असा आहे.