सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम ७ :
सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने यांचा व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि त्यांचे उत्पादन, पुरवठा व वितरण यांवर निर्बंध :
(१) कोणतीही व्यक्ती, तिच्याकडून उत्पादित केलेल्या, पुरवठा केलेल्या किंवा वितरण केलेल्या सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांच्या प्रत्येक पुडक्यावर किंवा त्यांच्या लेबलवर १.(विहित केल्याप्रमाणे सचित्र चेतावणीसह अशी निर्दिष्ट चेतावणी) असल्याखेरीज प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे सिगारेटचे किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांचे उत्पादन करणार नाही, त्याचा पुरवठा करणार नाही किंवा वितरण करणार नाही.
(२) कोणतीही व्यक्ती, तिच्याकडून विकण्यात आलेल्या, पुरवठा केलेल्या उत्पादनांच्या प्रत्येक पुडक्यावर किंवा त्याच्या लेबलवर वैधानिक इशारा दिलेल्या असल्याखेरीज, सिगारेटचा किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांचा व्यापार किंवा वाणिज्यव्यवहार करणार नाही.
(३) कोणतीही व्यक्ती, तिच्याकडून आयात होणाऱ्या सिगारेटच्या किंवा इतर तंबाखू उत्पादनांच्या प्रत्येक पुडक्यावर किंवा त्याच्या लेबलवर वैधानिक इशारा असल्याखेरीज, भारतात मूल्याच्या मोबदल्यात वितरण किंवा पुरवठा करण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी सिगारेटची किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनाची आयात करणार नाही.
(४) मूल्याच्या मोबदल्यात वितरण, विक्री किंवा पुरवठा करण्यासाठी आवेष्टित करण्यात आलेल्या सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांच्या पुडक्यांच्या किमान एका सर्वांत मोठ्या पृष्ठभागावर वैधानिक इशारा दिलेला असेल.
(५) कोणतीही व्यक्ती, तिच्याकडून उत्पादन झालेल्या, पुरवठा केलेल्या किंवा वितरित केलेल्या सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांच्या प्रत्येक पुडक्यावर किंवा त्याच्या लेबलवर, प्रत्येक सिगारेटमधील किंवा, यथास्थिति, कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनातील निकोटिनचे आणि टारचे घटक, त्याच्या कमाल अनुज्ञेय मर्यादांसह दर्शविलेले असल्याखेरीज सिगारेटचे किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनाचे, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे उत्पादन, पुरवठा किंवा वितरण करणार नाही :
परंतु, निकोटिन आणि टारचे घटक हे, या अधिनियमाखाली केलेल्या नियमांद्वारे विहित करण्यात येईल अशा कमाल अनुज्ञेय प्रमाणपेक्षा अधिक प्रमाणात नसतील.
——–
१. २००७ चा अधिनियम क्रमांक ३८ याच्या कलम २ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.