सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम ३ :
व्याख्या :
या अधिनियमात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, –
(a)(क) जाहिरात यात, नोटीस, परिपत्रक, लेबल, वेष्टन किंवा अन्य कागदपत्र या स्वरूपात केलेल्या कोणत्याही दृश्य प्रतिरूपणाचा समावेश आहे आणि तसेच त्यात, तोंडी किंवा प्रकाश, आवाज, धूर किंवा वायू उत्पन्न करून किंवा पारेषित करून त्याद्वारे केलेल्या कोणत्याही घोषणेचा समावेश आहे;
(b)(ख) सिगारेट,-
(एक) कागदाचे किंवा तंबाखूचा अंतर्भाव नसलेल्या अशा कोणत्याही अन्य पदार्थाचे वेष्टन असलेली तंबाखूची कोणतीही गुंडाळी;
(दोन) तंबाखूचा अंतर्भाव असलेल्या अशा कोणत्याही अन्य पदार्थाचे वेष्टन असलेली तंबाखूची कोणतीही गुंडाळी, जी तिचे दृश्यस्वरूप, फिल्टरमध्ये वापर केलेल्या तंबाखूचा प्रकार किंवा त्याचे आवेष्टन आणि लेबल यावरून सिगारेट म्हणून उपभोक्त्याला देऊ करता येईल किंवा त्याच्याकडून खरेदी केली जाऊ शकेल, अशा गुंडाळीचा समावेश होतो; परंतु, यात विडी, चिरूट आणि सिगार यांचा समावेश होत नाही;
(c)(ग) वितरण यात नमुना म्हणून केलेल्या – मग ते मोफत असो किंवा अन्यथा असो – वितरणाचा समावेश आहे;
(d)(घ) निर्यात याचा व्याकरणिक रूपभेद आणि सजातीय शब्दप्रयोग यांसह अर्थ, भारतातून भारताबाहेरील ठिकाणी नेणे, असा आहे;
(e)(ङ) विदेशी भाषा याचा अर्थ, जी एकतर भारतीय भाषा नाही किंवा इंग्रजी भाषा नाही, अशी भाषा, असा आहे;
(ee)१.(ङङ) हुक्का बार याचा अर्थ, अशी आस्थापना जिथे लोक एकत्र येऊन सामुदायिक हुक्का किंवा नार्गिले (गुडगुडी) जे प्रत्येकाला दिले जाते, यातून तंबाखूचे धुम्रपान करतात, असा आहे;)
(f)(च) आयात याचा व्याकरणिक रूपभेद आणि सजातीय शब्दप्रयोग यांसह अर्थ, भारताबाहेरील एखाद्या ठिकाणाहून भारतात आणणे, असा आहे;
(g)(छ) भारतीय भाषा याचा अर्थ, संविधानाच्या आठव्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेली भाषा, असा आहे आणि यात, अशा भाषेच्या कोणत्याही बोली भाषेचा समावेश आहे;
(h)(ज) लेबल याचा अर्थ, कोणत्याही पुडक्यावर लावलेला किंवा त्यावर दिसून येणारा कोणताही लिखित, चिन्हांकित, मुद्रांकित, धापील किंवा रेखाचित्रीय मजकूर, असा आहे;
(i)(झ) पुडके यात आवेष्टन, पेटी, खोका, पत्र्याचा डबा किंवा अन्य पात्र यांचा समावेश आहे;
(j)(ञ) विहित याचा अर्थ, या अधिनियमाखाली करण्यात आलेल्या नियमांद्वारे विहित केलेले, असा आहे;
(k)(ट) उत्पादन यात व्याकरणिक रूपभेद आणि सजातीय शब्दप्रयोग यांसह सिगारेट, सिगार, चिरूट, विड्या, सिगारेटचा तंबाखू, पाईपचा तंबाखू, हुक्क्याचा तंबाखू, चघळण्याचा तंबाखू, पानमसाला किंवा तंबाखू हे एक घटकद्रव्य (मग ते कोणत्याही नावाने ओळखले जात असो) असलेली कोणतीही चघळण्याची सामग्री किंवा तपकीर याचा समावेश आहे आणि त्यात, –
(एक) पात्राचे आवेष्टन करणे, लेबल लावणे किंवा पुन्हा लेबल लावणे;
(दोन) ठोक स्वरूपातील पुडक्यांतून फुटकळ पुडक्यांमध्ये आवेष्टित करणे; आणि
(तीन) तंबाखू उत्पादने विक्रीयोग्य करण्यासाठी कोणतीही अन्य पद्धत स्वीकारणे, या बाबीचा देखील समावेश आहे;
(l)(ठ) सार्वजनिक ठिकाण याचा अर्थ, जिथे लोकांना प्रवेश करता येतो – मग तो हक्क म्हणून असो किंवा नसो – असे कोणतेही ठिकाण, असा आहे आणि त्यात, श्रोतृगृह, रूग्णालय इमारती, रेल्वे प्रतिक्षागृहे, मनोरंजन केंद्रे, उपाहारगृहे, सार्वजनिक कार्यालये, न्यायालय इमारती, शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, सार्वजनिक वाहने आणि जनतेकडून ज्या ठिाकणांना भेटी देण्यात येतात अशी ठिकाणे, यांचा समावेश आहे. परंतु त्यात, कोणत्याही खुल्या जागेचा समावेश नाही;
(m)(ड) विक्री याच्या व्याकरणिक रूपभेद आणि सजातीय शब्दप्रयोग यांसह अर्थ, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होणारे मालाच्या रूपातील मालमत्तेचे कोणतेही हस्तांतरण, असा आहे – मग ते रोख रकमेसाठी किंवा उधारीवर किंवा देवाणघेवाणीच्या मार्गाने असो किंवा नसो – आणि घाऊक स्वरूपातील असो किंवा किरकोळ स्वरूपातील असो आणि त्यात, विक्रीचा करार आणि विक्रीसाठी देकार आणि विक्रीसाठी प्रदर्शित करणे, यांचा अंतर्भाव आहे;
(n)(ढ) धूम्रपान याचा अर्थ, कोणत्याही स्वरूपातील तंबाखूचे धूम्रपान, असा आहे – मग ते सिगारेट, सिगार, विड्या या स्वरूपात असो किंवा अन्यथा पाईपच्या, वेष्टनाच्या किंवा कोणत्याही अन्य उपकरणांच्या सहाय्याने असो;
(o)(ण) वैधानिक इशारा याचा अर्थ, या अधिनियमाखाली तयार केलेल्या नियमांद्वारे विहित करण्यात येईल अशा स्वरूपात आणि रीतीने सिगारेटच्या किंवा इतर तंबाखू उत्पादनांच्या पुडक्यावर छापलेला किंवा रंगवलेला किंवा कोरलेला असा सिगारेट किंवा इतर तंबाखू उत्पादनांच्या वापराच्या विरोधातला इशारा, असा आहे;
(p)(त) तंबाखू उत्पादने याचा अर्थ, अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेली उत्पादने, असा आहे.
——–
१. २०१८ चा महाराष्ट अधिनियम क्रमांक ६० याच्या कलम २ द्वारा समाविष्ट करण्यात आले.