सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम ३१ :
केंद्र सरकारचा नियम करण्याचा अधिकार :
(१) केंद्र सरकारला या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करता येतील.
(२) पूर्ववर्ती अधिकाराच्या सर्वधारणतेला बाधा न आणता अशा नियमांमध्ये पुढील सर्व किंवा कोणत्याही बाबीसाठी तरतूद करता येईल –
(a)(क) कलम ३ च्या खंड (ण) अन्वये सिगारेटच्या किंवा इतर तंबाखू उत्पादनांच्या बाबतीत ज्या नमुन्यात व रीतीने इशारा द्यावयाचा तो नमुना व रीत विनिर्दिष्ट करणे;
(b)(ख) कलम ७, पोटकलम (५) च्या परंतुकान्वये सिगारेटमध्ये किंवा इतर तंबाखू उत्पादनांमध्ये अनुज्ञेय असेल असे निकोटिन आणि टारच्या घटकांचे किमान प्रमाण विनिर्दिष्ट करणे;
(c)(ग) कलम ८, पोटकलम (२) अन्वये सिगारेटच्या किंवा इतर तंबाखू उत्पादनांच्या प्रत्येक पुडक्यावर किंवा त्यांच्या लेबलवर वैधानिक इशारा नमूद करण्याची रीत विनिर्दिष्ट करणे;
(d)(घ) कलम १० अन्वये, वैधानिक इशारा देताना किंवा सिगारेटमधील किंवा इतर तंबाखू उत्पादनांमधील निकोटिन आणि टारचे घटक दर्शविण्यात येणाऱ्या अक्षरांची आणि आकड्यांची किंवा दोहोंची उंची विनिर्दिष्ट करणे;
(e)(ड) कोणत्याही इमारतीत प्रवेश करण्याची आणि तिची झडती घेण्याची रीत आणि सिगारेटची किंवा इतर तंबाखू उत्पादनांची पुडकी ताब्यात घेण्याची रीत आणि ताब्यात घेतलेल्या मालाची यादी तयार करण्याची व ज्या व्यक्तीच्या कब्जातून अशी सिगारेटची किंवा इतर तंबाखू उत्पादनांची पुडकी ताब्यात घेण्यात आली असतील त्या व्यक्तीला ती सुपूर्द करण्याची रीत, यांची तरतूद करणे;
(f)(च) विहित करणे आवश्यक असलेली किंवा विहित करण्यात येईल अशी अन्य कोणतीही बाब.
(३) या कलमाखाली केलेला प्रत्येक नियम आणि कलम ३० अन्वये केलेली प्रत्येक अधिसूचना, ती करण्यात आल्यानंतर होईल तितक्या लवकर, संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर, ते सत्रासीन असताना, एका सत्राने बनवलेल्या अथवा दोन किंवा अधिक लागोपाठची सत्रे मिळून बनलेल्या अशा एकूण तीस दिवसांच्या कालावधीकरिता ठेवला जाईल, आणि पूर्वोक्त सत्राच्या किंवा क्रमवर्ती सत्रांच्या पाठोपाठचे सत्र संपण्यापूर्वी जर त्या नियमात किंवा अधिसूचनेत कोणताही फेरबदल करण्याबाबत दोन्ही सभागृहांचे एकमत झाले अथवा तो नियम किंवा ती अधिसूचना करण्यात येऊ नये याबाबत दोन्ही सभागृहांचे एकमत झाले तर, त्यानंतर तो नियम किंवा ती अधिसूचना अशा फेरबदल केलेल्या स्वरूपातच अंमलात येईल, किंवा, यथास्थिति, मुळीच अंमलात येणार नाही. तथापि, अशा कोणत्याही फेरबदलामुळे किंवा शून्यीकरणामुळे, तत्पूर्वी त्या नियमांन्वये किंवा अधिसूचने अन्वये करण्यात आलेल्या कोणत्याही गोष्टीच्या विधिग्राह्यतेस बाध येणार नाही.