सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम २६ :
कंपन्यांनी केलेले अपराध :
(१) जेव्हा या अधिनियमाखालील अपराध एखाद्या कंपनीकडून करण्यात आला असेल तेव्हा, तो अपराध जेव्हा घडला त्यावेळी त्या कंपनीचा प्रभार असलेली आणि त्या कंपनीचे कामकाज चालवण्याबाबत जबाबदार असलेली प्रत्येक व्यक्ती, तसेच ती कंपनी त्या अपराधाबद्दल दोषी असल्याचे मानण्यात येईल, आणि तद्नुसार कार्यवाही केली जाण्यास व शिक्षा होण्यास पात्र असेल :
परंतु असे की, या कलमातील कोणत्याही गोष्टीमुळे अशा कोणत्याही व्यक्तीने, जर तिने तो अपराध तिला माहित नसताना घडला होता किंवा असा अपराध घडू नये म्हणून तिने सर्वतोपरी खबरदारी घेतली होती असे सिद्ध केले तर, कोणत्याही शिक्षेस पात्र ठरवली जाणार नाही.
(२) पोटकलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत केलेले असले तरी, जेव्हा या अधिनियमाखालील एखादा अपराध एखाद्या कंपनीकडून घडला असेल आणि जर असे सिद्ध करण्यात आले असेल की, तो अपराध कंपनीचा कोणताही संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा इतर अधिकारी यांच्या संमतीने किंवा मूक संमतीने घडला आहे किंवा त्यांच्या हयगयीमुळे घडला आहे तर, असा संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा इतर अधिकारी यांच्याविरूद्ध कार्यवाही केली जाईल आणि तद्नुसार त्यास शिक्षा होईल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ, –
(a)(क) कंपनी याचा अर्थ, निगमनिकाय, असा आहे आणि त्यात भागीदारी संस्था व व्यक्तींचा इतर संघ यांचा समावेश आहे; आणि
(b)(ख) संचालक याचा भागीदारी संस्थेच्या संबंधात अर्थ, त्या भागीदारी संस्थेचा भागीदार, असा आहे.