Constitution परिशिष्ट २ : संविधान (जम्मू व काश्मीर मध्ये लागू) आदेश २०१९

भारताचे संविधान ( राज्यघटना )
परिशिष्ट २ :
१.(संविधान (जम्मू व काश्मीर मध्ये लागू) आदेश २०१९)
सी.ओ. २७२
संविधानाच्या अनुच्छेद ३७० च्या खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन, राष्ट्रपती, जम्मू व काश्मीर राज्य सरकारच्या सहमतिने निम्नलिखित आदेश करीत आहे :-
१.(१) या आदेशाचे नाव संविधान (जम्मू व काश्मीर मध्ये लागू) आदेश २०१९ आहे.
(२) तो ताबडतोब अंमलात येईल, आणि त्यानंतर वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे संविधान (जम्मू आणि काश्मीरला लागू) आदेश, १९५४ ला अधिग्रहित करेल.
२. वेळोवेळी दुरुस्त केल्याप्रमाणे, राज्यघटनेतील सर्व तरतुदी, जम्मू आणि काश्मीर राज्याच्या संबंधात लागू होतील आणि त्यांना लागू होणारे अपवाद आणि सुधारणा खालीलप्रमाणे असतील:-
अनुच्छेद ३६७ मध्ये, खालील खंड जोडला जाईल, तो म्हणजे:-
(४) जम्मू व काश्मीर राज्याच्या संबंधात ते लागू असल्याप्रमाणे या संविधानाच्या प्रयोजनार्थ,-
क) संविधानाचे किंवा त्याच्या तरतुदींचे संदर्भ याचा, उक्त राज्याच्या संबंधात लागू असल्याप्रमाणे संविधानाचे किंवा त्याच्या तरतुदींचे संदर्भ असल्याप्रमाणे अन्वयार्थ लावण्यात येईल;
ख) त्या त्या वेळी पदावर असलेल्या राज्याच्या मंत्रीपरिषदेच्या सल्ल्याने काम करणारा जम्मू व काश्मीरचा सदर-ए-रियासत म्हणून राज्याच्या विधानसभेच्या शिफारशीवरुन राष्ट्रपतींनी त्या त्या वेळी मान्यता दिलेल्या व्यक्तीचे संदर्भ हे, जम्मू व काश्मीरच्या राज्यपालाचे संदर्भ म्हणून अन्वयार्थ लावण्यात येईल;
ग) उक्त राज्याच्या शासनाचे संदर्भ हे, मंत्रीपरिषदेच्या सल्ल्याने काम करणाऱ्या जम्मू व काश्मीरच्या राज्यपालाचे संदर्भ अंतर्भूत असल्याप्रमाणे अन्वयार्थ लावण्यात येईल; आणि
घ) या संविधानाच्या अनुच्छेद ३७० च्या खंड (३) च्या परंतुकामधील, खंड (२) मध्ये निर्दिष्ट केलेली राज्याची संविधान सभा हा शब्द प्रयोग, राज्याची विधानसभा असा वाचण्यात येईले.)
——-
१. विधि और न्याय मंत्रालय, विधायी विभाग आदेश क्रमांक सा.का.नि ५५१ (अ), दिनांक ५ ऑगस्ट २०१९, भारताचे राजपत्र, असाधारण, भाग २, खंड ३, उपखंड (१) मध्ये प्रकाशित.

Leave a Reply